अमोल शिंदेंनी 'मातोश्री'ऐवजी जपली 'राधाश्री'ची बांधिलकी ! जिल्हाप्रमुख बरडे संतापले

2Solapur_11.jpg
2Solapur_11.jpg

सोलापूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी शिवसेनेकडून 'मातोश्री'वरुन गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले, लक्ष्मण जाधव यांना संधी द्यावी, असे पत्र सचिव खासदार अनिल देसाई यांनी महापौर, विरोधी पक्षनेत्यांना पाठविले. मात्र, विरोधी पक्षनेते स्वत: अमोल शिंदे यांनी 'राधाश्री'ची जवळीकता दाखवत स्वत:सह मनोज शेजवाल आणि उमेश गायकवाड यांची स्थायी समितीवर निवड केली. त्यांनी पक्षाचा विश्‍वासघात करीत 'विश्‍वास'या शब्दावरील विश्‍वास उडविल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली आहे.


जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले...
पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी स्थायी समितीवर व परिवहन समितीसाठी कोणाला संधी द्यायची, हे 16 फेब्रुवारीलाच स्पष्ट केले. शुक्रवारी (ता. 19) त्यांच्या हातात पक्षाने सूचविलेली नावे  दिली. त्यानुसारच निवडी होतील, असे शिंदे यांनी सांगितले. मात्र, त्यांनी पक्षाचा आदेश डावलून स्वत:ची मनमानी करीत दुसऱ्याच नगरसेवकांना स्थायी व परिवहन समितीवर घेतले. ज्या मनोज शेजवाल यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात पक्षाविरोधात बंडखोरी केली . त्यांची यापूर्वीच पक्षातून हाकलपट्टी केली असून त्यांना अधिकृतपणे पक्षात अद्याप प्रवेश दिलेला नाही, असे असतानाही विरोधी पक्षनेत्यांनी स्थायी समितीवर त्यांना संधी दिल्याचे आश्‍चर्य वाटते. कोणाच्या सांगण्यावरुन त्यांनी हे पाऊल उचचले माहिती नाही, परंतु त्यांनी केलेला विश्‍वासघात आणि पक्षाचा डावलेला आदेश, याबद्दल वरिष्ठ स्तरावर कळविण्यात आल्याचेही ते म्हणाले.

पक्षाअंतर्गत कुरघोडीला वैतागून तत्कालीन विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्यांच्यासोबत आठ- दहा समर्थक नगरसेवकही पक्षांतर करतील, अशी शक्‍यता होती. मात्र, तसे झाले तर महापालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे जाईल, अशी भिती होती. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली. त्यामुळे कोठे यांचे पक्षांतर रखडले. पक्षांतर करताना कोठे यांनी बरडे यांच्यावर टिका केली तर बरडे यांनीही लगेचच पत्रकार परिषद घेऊन कोठेंची पक्षातून हाकलपट्टी केल्याचे जाहीर केले. त्यानंतर कोठेविरुध्द बरडे असा राजकीय संघर्ष सुरु झाला. कोठे यांनी पक्षांतर करुनही नुतन विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी त्यांची साथ सोडली नाही. स्थायी समिती सदस्य निवडीनंतर आता शिंदेविरुध्द कोठे असा वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, 2018 मध्ये स्थायी समितीचा वाद उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला. तीन वर्षांनी निवडणूक होत असतानाच वानकर यांना संधी मिळावी, अशी पक्षाची भूमिका होती. मात्र, त्यांना त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर विषय समित्यांपैकी एक समिती भारतसिंग बडूरवाले यांना मिळत असतानाही मिळाली नाही. ज्येष्ठ नगरसेवक म्हणून लक्ष्मण जाधव यांना संधी देण्याचाही निर्णय पक्षाच्या सचिवांनी घेतला. मात्र, तसे काहीच घडले नसल्याने या सर्व घडामोडींमागे नेमका कोण, याची चर्चा सुरु झाली आहे.


विरोधी पक्षनेते अमोल शिंदे म्हणाले...
विरोधी पक्षनेते होताना मला ज्यांनी मदत केली, माझ्या त्यावेळच्या अर्जावर ज्यांच्या स्वाक्षरी आहेत, त्यांना स्थायी समितीवर संधी दिली आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत घेतलेले सदस्य हेही शिवसेनेचेच असून त्यांना यापूर्वी या समितीत काम करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना या समितीवर घेतल्याचे मत विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी व्यक्‍त केले आहे. शिवसेना वाढावी या हेतूनेच आपण नगरसेवकांना स्थायी समितीत काम करण्याची संधी दिल्याचेही त्यांनी यावेळी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com