शिवसेनेचा विरोधी पक्षनेता म्हणून अमोल शिंदे फायनल ! सभागृहनेतेपदी शिवानंद पाटील? 

तात्या लांडगे 
Wednesday, 6 January 2021

विभागीय आयुक्‍तांकडील महेश कोठे यांच्या गट स्थापनेच्या तक्रारीवर आता तोडगा निघाला आहे. त्यामुळे महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून नगरसेवक अमोल शिंदे यांच्या नावावर आता शिक्‍कामोर्तब झाले आहे. दुसरीकडे, एक वर्षाचा कालावधी पूर्ण केलेले भाजपचे श्रीनिवास करली यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी शिवानंद पाटील यांची वर्णी लागणार आहे. 

सोलापूर : विभागीय आयुक्‍तांकडील महेश कोठे यांच्या गट स्थापनेच्या तक्रारीवर आता तोडगा निघाला आहे. त्यामुळे महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून नगरसेवक अमोल शिंदे यांच्या नावावर आता शिक्‍कामोर्तब झाले आहे. दुसरीकडे, एक वर्षाचा कालावधी पूर्ण केलेले भाजपचे श्रीनिवास करली यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी शिवानंद पाटील यांची वर्णी लागणार आहे. बजेट मीटिंग झाल्यानंतर या घडामोडींना वेग येणार असल्याचे दोन्ही पक्षांतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

पक्षातील नेत्यांना (नगरसेवकांना) संधी मिळावी, म्हणून अडीच वर्षानंतर महापौर, विरोधी पक्षनेता, उपमहापौर बदलले जातात. त्यानुसार महापौर बदलले, उपमहापौर बदलले, सभागृहनेताही बदलले. मात्र मागील चार वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून महेश कोठे हेच काम पाहात आहेत. तत्पूर्वी, कोठे यांच्यासह शिवसेनेतील अन्य काही नगरसेवकांनी विरोधी पक्षनेता म्हणून अमोल शिंदे यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केले. मात्र, त्यांना अद्याप ती संधी मिळाली नाही. परंतु, आता पक्षातर्फे महापालिकेचे नवे विरोधी पक्षनेते म्हणून अमोल शिंदे यांचा प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडे पाठविला जाणार आहे. 15 जानेवारीनंतर नगरसेवक अमोल शिंदे यांना विरोधी पक्षनेत्यांची गाडी मिळेल, अशी चर्चा आहे. 

तत्पूर्वी, अमोल शिंदे हे तरुण नगरसेवक असून पक्षवाढीच्या दृष्टीने त्यांची मदत होईल आणि सत्ताधाऱ्यांशी भांडून नगरसेवकांच्या निधीसाठी प्रयत्न करतील, असा विश्‍वास पक्षातील काही नगरसेवकांना वाटला. त्यामुळे त्यांनी तेव्हाच अमोल शिंदे यांच्या नावाला पसंती दर्शविली होती. त्यांना पक्षातून कोणताही विरोध नसल्याने अमोल शिंदे हे काही दिवसांतच विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहतील, अशीही चर्चा आहे. 

भाजपतर्फे सभागृहनेता म्हणून शिवानंद पाटलांना पसंती 
महापालिकेतील कामकाजात पक्षातील अभ्यासू, ज्येष्ठ नगरसेवकांना सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून दरवर्षी सभागृहनेता बदलला जातो. विद्यमान सभागृहनेता श्रीनिवास करली यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. मात्र, कोरोनामुळे आपल्याला म्हणावे तसे काम करण्याची संधी न मिळाल्याने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करली यांनी पक्षाकडे केली आहे. परंतु, त्यांना बदलून आता शिवानंद पाटील यांना सभागृहनेता करण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. बजेट झाल्यानंतर यासंबंधीचा निर्णय होईल, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amol Shinde final as Shiv Senas Leader of Opposition