
डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अल्पशा मताने विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीनंतर अनिकेत देशमुख यांनी आपल्या शिक्षणासाठी तालुक्याच्या राजकारणाकडे पाठ फिरवली होती.
सांगोला (सोलापूर) : येथील विधानसभा निवडणुकीतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख हे एम. एस. ऑर्थो ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षणांनतर ते राजकारणात सक्रिय सहभागी होणार का, याकडे सांगोलावासीयांचे लक्ष लागले आहे.
डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अल्पशा मताने विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीनंतर अनिकेत देशमुख यांनी आपल्या शिक्षणासाठी तालुक्याच्या राजकारणाकडे पाठ फिरवली होती. नुकतेच ते एम. एस. ऑर्थोची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
डॉ. अनिकेत यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यालय, बारावीपर्यंतचे शिक्षण लातूर येथे झाले. एम. बी. बी. एस. चे शिक्षण राजर्षी शाहू महाराज शासकीय मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथे तर एम. एस. ऑर्थोचे शिक्षण काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथे पूर्ण केले आहे. एम. एस. ऑर्थो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे सांगोला शहर व तालुक्यातून अनिकेत देशमुख यांचे अभिनंदन केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या जागी शेवटच्या क्षणी त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांना शेकापतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला असला तरी त्या निवडणुकीत त्यांचा मोठा प्रभाव दिसून आला होता. परंतु निवडणुकीनंतर शिक्षणासाठी ते बाहेर गेल्याने शेतकरी कामगार पक्षाचे निवडणुकीतील उमेदवारच जनतेच्या संपर्कात नसल्याने त्यांच्यावर मोठी टीकाटिप्पणी झाली होती. आपले शिक्षण झाल्यानंतर आता ते पुन्हा राजकारणात सक्रिय सहभाग घेतात का, याबाबत सगळीकडे चर्चा होत आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल