नागनाथ क्षीरसागर जात प्रमाणपत्र प्रकरण : माने, सोनवणेंच्या अधिकाराबद्दल युक्तिवाद पूर्ण; 21 जानेवारीला सुनावणी 

प्रमोद बोडके 
Friday, 8 January 2021

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने व पेनूर गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे यांनी याबाबत तक्रार केली असून, या दोघांनाही क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचा मुद्दा नागनाथ क्षीरसागर यांनी वकिलामार्फत समितीसमोर मांडला. माने व सोनवणे यांच्या अधिकाराबद्दल काल युक्तिवाद पूर्ण झाला असून, याबाबतचा अंतिम निर्णय 21 जानेवारीच्या सुनावणीत होण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर : मोहोळ शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांच्याकडील हिंदू खाटीक या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राबद्दल सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीपुढे सुनावणी झाली. मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने व पेनूर गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे यांनी याबाबत तक्रार केली असून, या दोघांनाही क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचा मुद्दा नागनाथ क्षीरसागर यांनी वकिलामार्फत समितीसमोर मांडला. माने व सोनवणे यांच्या अधिकाराबद्दल काल युक्तिवाद पूर्ण झाला असून, याबाबतचा अंतिम निर्णय 21 जानेवारीच्या सुनावणीत होण्याची शक्‍यता आहे. 

हनुमंत माने व सुजाता माने यांच्याकडे अनुसूचित जाती व व्हीजेएनटी जातीचा दाखला आहे. या दाखल्यांचे वैधता प्रमाणपत्रही त्यांनी मिळविले आहे. त्यामुळे हनुमंत माने हे अनुसूचित जातीचे नाहीत, असा मुद्दा क्षीरसागर यांनी वकिलांच्या माध्यमातून उपस्थित केला. सुनावणीत क्षीरसागर यांनी हनुमंत माने व सुजाता माने यांच्याकडे असलेल्या दोन्ही जातीच्या दाखल्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रत सोलापूरच्या जिल्हा जात पडताळणी समितीला सादर केली आहे. 

नागनाथ क्षीरसागर यांच्या विरोधात हनुमंत माने यांनी निवडणूक लढविलेली नाही. क्षीरसागर यांच्यामुळे हनुमंत माने यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे हनुमंत माने यांना तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचा दावा क्षीरसागर यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य सोनवणे यांनी पेनूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढविली आहे. त्यांनी मोहोळ विधानसभेची निवडणूक लढविली नाही किंवा त्यासाठी उमेदवारी अर्जदेखील दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांनाही नागनाथ क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे क्षीरसागर यांनी वकिलामार्फत समितीसमोर सुनावणीत मांडले. 

समिती चौकशी लावते अन्‌ जात वैधता प्रमाणपत्रही देते !
सोलापूरची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागनाथ क्षीरसागर यांच्या रक्त संबंधातील व्यक्तींना हिंदू खाटीक जातीचे जात वैधता प्रमाणपत्र देत आहे. 2018, 2019 व फेब्रुवारी 2020 मध्ये या समितीने जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे. तीच समिती व समितीतमधील तेच सदस्य नागनाथ क्षीरसागर यांच्या विरोधात दाखल झालेल्या जात प्रमाणपत्रावर सुनावणी घेत आहे. समितीचा हा कारभार अनाकलनीय असल्याचे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argument regarding Nagnath Kshirsagars caste certificate was completed