वाहतुकीच्या कोंडीत सापडलेल्या आसरा चाैक रुंदीकरण कामास सुरुवात

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 20 January 2021

आसरा चौक हा जुळे सोलापुर, मुख्य शहर व परिसरातील वसाहतींशी जोडलेला आहे. आसरा पूल हा अरुंद झाल्याने या पुलावरून मोठ्या संख्येने येणारी वाहने चौकात येऊन अडकतात. त्यानंतर विजापूर रस्त्यावरील मालवाहतूक या चौकाशी जोडली गेल्याने वाहतुकीचा प्रश्‍न अधिक गंभीर झाला होता. आसरा पुलाच्या संदर्भात रेल्वे व स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय झाल्याशिवाय पुलाचे रुंदीकरण केवळ अशक्‍यच बनले आहे.

सोलापूर :  शहरातील वर्दळीच्या आसरा चौकाच्या रुंदीकरणाचे काम महानगरपालिकेकडून सूरू झाले आहे. मागील काही वर्षात वाढलेल्या वसाहती, वाहतूक व गर्दीमुळे हा चौक सातत्याने वाहतुकीच्या कोंडीत सापडत होता. रुंदीकरणाच्या कामाने या भागातील बाजारपेठ व वाहनाचालकांना दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा : सोलापूर मर्चंट बॅंकेचे पतसंस्थेत रुपांतरण झाले पाहिजे ः जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची स्पष्ट भूमिका 

आसरा चौक हा जुळे सोलापुर, मुख्य शहर व परिसरातील वसाहतींशी जोडलेला आहे. आसरा पूल हा अरुंद झाल्याने या पुलावरून मोठ्या संख्येने येणारी वाहने चौकात येऊन अडकतात. त्यानंतर विजापूर रस्त्यावरील मालवाहतूक या चौकाशी जोडली गेल्याने वाहतुकीचा प्रश्‍न अधिक गंभीर झाला होता. आसरा पुलाच्या संदर्भात रेल्वे व स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय झाल्याशिवाय पुलाचे रुंदीकरण केवळ अशक्‍यच बनले आहे. निदान चौकाचे रुंदीकरण झाले तर आसरापूलाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना थोडीफार सोय होऊ शकणार आहे. या चौकाच्या परिसरात बाजारपेठ देखील विकसित झाली आहे. होटगी रोडने येत असताना एका बाजूला दवाखाने तर दुसऱ्या बाजुला दुकाने असल्याने वाहनांच्या वदर्ळीत भर पडत आहे. 
सध्या मझरेवाडी, होटगी रोड, आसरा पुलाकडील जुळे सोलापूरचा भाग या भागासाठी ही मध्यवर्ती जागा झाली आहे. बाजारपेठे सोबत खरेदी व कामकाजासाठी ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या ही हजारोच्या घरात आहे. या अरुंद चौकामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होता. पादचाऱ्यांना तर या वाहनांच्या गर्दीत चालणे देखील अडचणीचे झाले आहे. परिसरातील नागरिकांना वाहनवर्दळीमुळे घराबाहेर पडणे देखील अशक्‍य झाले होते. 
आसरा चौकाच्या चारही बाजूला असलेले रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अरुंद आहेत. त्यामुळे चौकाच्या मध्यभागी पोहोचणाऱ्या या रस्त्यांचे रुंदीकरण केले जात आहे. चौकाच्या चारही टोकाला डांबरीकरणाचे काम केले जात आहे. त्यासाठी खोदकाम सूरू झाले आहे. यामुळे चौकात येणारी अधिक संख्येची वाहने ये जा करण्यासाठी मोकळी जागा मिळणार आहे. तसेच पादचाऱ्यांना देखील पायी चालण्यासाठी पुरेशी जागा मिळू शकेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asara Chak widening work found in traffic jam started