
दक्षिण सोलापूर (सोलापूर) : भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात ज्येष्ठागौरी व्रत केले जाते. या गौरीचे अनुराधा नक्षत्रावर आवाहन, पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन मूळ नक्षत्रावर केले जाते. पुराणातील ओझरते उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली अशी माहिती ज्येष्ठा गौरीसंबंधी उपलब्ध आहे. या गौरीचे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर होत असल्याने तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
प्रत्येकाने आध्यात्मिक उन्नतीसाठी अनिष्ट गोष्टीबद्दलही मनात पूज्यभाव बाळगला पाहिजे, असे शास्त्र सांगते. त्यामुळे या गौरीबरोबर लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मी (अवदसा) हिची सुद्धा पूजा केली जात असल्याची माहिती ज्योतिष पंडित व पुरोहित गजानन गवई यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. समुद्रमंथनातून चौदा रत्ने निघाली. त्यामध्ये लक्ष्मी हे एक रत्न मिळाले. तिचा साक्षात श्री विष्णूने पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु आपली ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मीला अविवाहित ठेवून श्रीविष्णू बरोबर विवाहास लक्ष्मीने नकार दिला. मग श्रीविष्णूने अलक्ष्मीचा विवाह एका तपस्व्याबरोबर करवून दिल्यानंतर लक्ष्मीबरोबर विवाह केला.
अलक्ष्मीला दिले श्रीविष्णूने तीन वर
अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुण पाहून त्या तपस्व्याने वनात पलायन केले. त्यामुळे अलक्ष्मी एका अश्वत्थ म्हणजेच पिंपळवृक्षाजवळ रडत बसली. एका शनिवारी श्रीविष्णू तेथून जात असताना अलक्ष्मी रडत असल्याचे त्यांनी पाहिले. तिची हकिकत ऐकल्यानंतर श्रीविष्णूंनी तिला तीन वर दिले. त्यामध्ये पहिला वर म्हणजे जेथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल त्या घरात तिने अवश्य वास्तव्य करावे. दुसरा वर म्हणजे शनिवारी अश्वत्थ म्हणजेच पिंपळवृक्षास प्रदक्षिणा करणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. तिसरा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची आदरपूर्वक पूजाअर्चा केली जाईल. जेथे अशा प्रकारे तिचा गौरव होत नसेल तेथे तिने अवश्य ठाण मांडावे. या कथेनुसार भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठागौरी व्रत म्हणजेच गौरीपूजन महत्त्वाचे मानले जाते, असे श्री. गवई यांनी सांगितले.
या गौरी व लक्ष्मीचे पूजन करताना ते असेच असले पाहिजे, याचा आग्रह लक्ष्मी किंवा गौरीचा नसतो. परंपरेनुसार प्रत्येकाकडे विविध पद्धती आहेत. त्यानुसार कालसुसंगत पद्धतीने गौरी आवाहन व पूजन करावे. शक्यतो एकत्रित कुटुंबातील सदस्यांनी वेगळे राहात असलो तरी या पूजनासाठी एकत्र यावे. सध्या सर्वत्र विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या पूजेबाबत संभ्रम आहे. अनेक घरांत मुले नोकरी- व्यवसायामुळे दूर राहात असल्याने व वार्धक्यामुळे पूजन करणे शक्य होत नाही, मात्र जसे जमेल तसे ते करावे, असेही श्री. गवई यांनी सांगितले.
(या माहितीमधून कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेचा प्रचार करण्याचा आमचा हेतू नाही.)
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.