पंढरपुरात कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचे प्रयत्न 

dattatray_bharne
dattatray_bharne

पंढरपूर (जि. सोलापूर) : सोलापूर शहरानंतर आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका विचारात घेता राज्य शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने वेगाने तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 रुग्णांवर उपचार सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. 
या संदर्भात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना विचारले असता, त्यांनीही येथील उपजिल्हा रुग्णालय हे कोविडग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. मुंबईत उद्या बैठक होणार आहे. त्या बैठकीत देखील पंढरपूर येथे कोविड रुग्णालय सुरू करण्याबाबत आपण मागणी करणार असल्याचेही त्यांनी आज "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
सोलापूर जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तरीही जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सर्व ते प्रयत्न सुरू केले आहेत. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या लोकांची संख्याही इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे. शिवाय पंढरपूर हे मध्यवर्ती शहर असल्याने पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय हे कोविड -19 ग्रस्तांसाठी सर्व सोयीनीयुक्त आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात लवकरच कोविड-19 ग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 
येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढली तर येथील उपजिल्हा रुग्णालयात आवश्‍यक ती सर्व यंत्रणा उभी केली जाणार आहे. सध्या येथील उपजिल्हा रुग्णालयात दररोज किमान 600 ते 700 रुग्णांवर उपचार केले जातात. येथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी पंढरपूर शहरातील काही खासगी रुग्णालयात त्यांची सोय केली जाणार आहे. शहरातील काही खासगी डॉक्‍टरांनीही तशी सकारात्मकता दर्शवली आहे. 
येथील उपजिल्हा रुग्णालयाला कोविड -19 दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आमदार भारत भालकेंनी देखील केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com