सोलापूर लोकसभेसाठी आवतडे गटाची तयारी सुरु?

हुकूम मुलाणी
Thursday, 27 February 2020

लोकसभा निवडणुकीतील पराभूत काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने निवडणूक लागली तर उमेदवार निवडीचा मोठा गुंता दोन्ही पक्षात समोर उभा राहणार आहे. अशा परिस्थितीत मंगळवेढ्यातील सहकारी संस्थेवर एकहाती वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी तालुक्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले प्रबळ बस्तान बसवले.

मंगळवेढा (सोलापूर) : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीचा दाखला रद्द झाल्यानंतर या जागेवर संभाव्य उमेदवारीविषयी भाजपाकडून लक्ष्मण ढोबळे यांनी तर महाविकासकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दावे केले असतानाच जिल्ह्याच्या राजकारणात अनपेक्षित धक्का दिलेल्या अवताडे गटानेही निवडणूक लागली तर ही जागा लढविण्याचा इरादा स्पष्ट केला, पण कोणत्या पक्षाकडून याचा निर्णय मात्र परिस्थिती पाहून घेणार असल्याचे स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीतील पराभूत काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने निवडणूक लागली तर उमेदवार निवडीचा मोठा गुंता दोन्ही पक्षात समोर उभा राहणार आहे. अशा परिस्थितीत मंगळवेढ्यातील सहकारी संस्थेवर एकहाती वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी तालुक्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले प्रबळ बस्तान बसवले. अडीच वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अवघ्या तीन जागा मिळाल्या असताना हुलजंती जिल्हा परिषद गटातून माजी पालकमंत्री ढोबळे यांच्या पत्नीस पराभूत केलेल्या शिला शिवशरण यांना समाज कल्याण सभापतीपदी संधी दिली. जिल्हा परिषदेच्या आखाड्यातील नव्या समीकरणात त्यांची भूमिका निर्णायक ठरली. अशा परिस्थितीत दोन महिन्यापुर्वी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील राखीव जागेचा चेहरा असताना तडजोडीच्या राजकारणात आवताडेनी भाजपबरोबर उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले. अखेरच्या टप्प्यात त्यांना अध्यक्षपद देण्यासाठी राष्ट्रवादीने देखील तयारी केली. परंतु शब्द दिल्यामुळे त्यांनी अध्यक्षपदावर पाणी सोडत उपाध्यक्षपद घेतले. पराभूत उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभवानंतर देखील मतदारांशी संपर्क ठेवला नाही, मताधिक्य दिलेल्या मंगळवेढा तालुक्याला साधा आभाराचा दौरा देखील केला नाही. आजमितीला दोन्ही पक्षाकडे राखीव जागेसाठी जनमानसात चांगली व जनसंपर्कात सातत्य असलेल्या चेहय्राचा अभाव असल्याचे बोलले जात आहे.
आता लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्यामुळे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दावा केला. पण या जागेवर आवताडे गटाकडे राखीव जागेचासाठी समाज कल्याणच्या माजी सभापती शीला शिवशरण यांच्या रूपाने आवताडे गटाकडे मागासवर्गीय चेहरा असून जवळपास या समाजाचे दोन लाखांच्या आसपास मतदार मतदारसंघांमध्ये आहे. जिल्हा परिषदेच्या आखाडाप्रमाणे लोकसभेच्या आखाड्यात समाधान आवताडे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यातून मंगळवेढ्याच्या अस्मिता आणि जिल्ह्याच्या राजकारणात दिशा देणारे संधी या निमित्ताने निर्माण होणार आहे. अवताडे गट जिल्ह्याच्या राजकारणात प्रमाणे लोकसभेच्या आखाड्यात निर्णायक भूमिका बजावणार आहे. त्यामुळे यापुढील काळात गटाच्या हालचालीवर राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार हे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awatade group started Preparations for Solapur LokSabha