
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी नगरसेवक गणेश पुजारी यांची प्रतिकात्मक कटींग करीत गांधीगिरी केली.
सोलापूर - शहरातील केशकर्तनालयाची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, या व नाभिक समाजाच्या इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी प्रतीकात्मक "कटिंग' आंदोलन करण्यात आले. प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी नगरसेवक गणेश पुजारी यांची प्रतीकात्मक "कटिंग' केली. या वेळी नाभिक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मागील आठवड्यापासून काही व्यवसाय, उद्योग व दुकाने यांना नियम व अटी घालून ज्या पद्धतीने सुरवात करण्यास परवानगी देण्यात आली त्याच पद्धतीने नाभिक समाजाला दुकाने, सलून पार्लर यांनाही नियम व अटी घालून व्यवसाय चालू करण्यास परवानगी देण्यात यावी. व्यवसाय सुरू न झाल्यास नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाला महिना 10 हजार अनुदान स्वरूपात देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रतीकात्मक "कटिंग' करून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक बबन शिंदे, अनिरुद्ध वाघमारे, नाभिक समाजाचे शहराध्यक्ष मोहन जमदाडे, भारत क्षीरसागर, यशवंत शेंद्रे उपस्थित होते. दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्री. चंदनशिवे व श्री. पुजारी यांनी दिला.
सलून दुकाने उघडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आमचे कुटुंबीय आंदोलन करीत आहे. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. दुकाने उघडण्यास परवानगी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- मोहन जमदाडे, प्रतिनिधी, नाभिक समाज
दुकाने उघडण्यास परवानगी द्यायची नसेल तर समाजातील प्रत्येक कुटुंबीयांना दर महिन्याला किमान पाच हजार रुपयांची मदत द्यावी. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबीयांची उपासमार सुरू झाली आहे.
- भारत क्षीरसागर, प्रतिनिधी, नाभिक समाज
नाभिक समाजासाठी वंचित आघाडीची सोलापुरात गांधीगिरी (VIDEO)