बार्शी तालुक्‍यात 1 लाख 20 हजारांची देशी दारू जप्त 

प्रशांत काळे 
Sunday, 6 September 2020

बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी शेंद्रीपर्यंत गस्त घालत असताना त्यांना अवैध दारूचा टेम्पो कुर्डुवाडी येथून बार्शीकडे येत असल्याची माहिती मिळाली. खांडवी येथे गतिरोधक असलेल्या ठिकाणी तिघेजण वाहनांची तपासणी करीत थांबले असता पिकअप टेम्पो आला. या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोच्या पाठीमागील बाजूस रिकामे क्रेट तर पुढील बाजूस बॉक्‍स असल्याचे पोलिसांना आढळून आले. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर खांडवी येथे पिकअप टेम्पोमधून विनापरवाना, विनापास बेकायदेशीरपणे वाहतूक होत असलेली सुमारे एक लाख 20 हजार रुपयांची टॅंगो पंच देशी दारू पोलिसांनी छापा टाकून पकडली असून, तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मोहसीन महमूद सय्यद (वय 36, रा. नारी, ता. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिस राहुल बोंदर यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी जाधव, घोगरे, शहाणे हे अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी शेंद्रीपर्यंत गस्त घालत असताना, त्यांना अवैध दारूचा टेम्पो कुर्डुवाडी येथून बार्शीकडे येत असल्याची माहिती मिळाली. खांडवी येथे गतिरोधक असलेल्या ठिकाणी तिघेजण वाहनांची तपासणी करीत थांबले असताना पिकअप टेम्पो आला. या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोच्या पाठीमागील बाजूस रिकामे क्रेट तर पुढील बाजूस बॉक्‍स असल्याचे पोलिसांना आढळून आले. 

टेम्पोचालक मोहसीन सय्यद याच्याकडे चौकशी केली असता देशी दारू नारी येथून सागर बाळासाहेब बारंगुळे यांच्या सांगण्यावरून टेम्पोत भरली. कुर्डुवाडीच्या दिशेने घेऊन येण्यास तसेच त्यांनी वांगरवाडी फाट्याजवळ थांबण्यास सांगितले होते. त्यांचा फोनही लागेना, संपर्क होईना, ते आले नाहीत म्हणून परत नारीला जात आहे, असे टेम्पो चालकाने सांगितले. 

पोलिसांनी पंचांसमवेत पंचनामा करून टॅंगो पंच देशी दारूच्या एका बॉक्‍समध्ये 48 बाटल्या असे 47 बॉक्‍स (किंमत 1 लाख 17 हजार 312 रुपये), पिकअप टेम्पो तीन लाख रुपये असा चार लाख 17 हजार 312 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस फौजदार प्रवीण जाधव करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barshi Police confiscated 1.20 lakh worth of native liquor