"होय, मला मधुमेह आहे; पण इच्छाशक्ती दांडगी ठेवून केलाय कोरोनाचा सामना अन्‌ जिंकलोही !' 

fighter_corona
fighter_corona

बार्शी (सोलापूर) : "तपासणी अहवालामध्ये माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्या वेळी माझी शुगर 340 असल्याचे स्पष्ट झाले, तर रक्तदाबही वाढला होता. चार दिवस उपचार घेतले. इच्छाशक्ती दांडगी ठेवून कोरोनाचा सामना करायचे ठरवले. प्रकृतीची कोणतीही तक्रार नसताना, कसलाही त्रास झालेला नसताना, आई - वडिलांना शुगर नसताना मला शुगर आढळून आल्याने आश्‍चर्य वाटले. मात्र कोरोना रुग्णाने स्वतःचे मनोबल चांगले ठेवले, वेळेत उपचार केला तर कोरोनावर मात करता येते', असा स्वानुभव मधुमेह असताना कोरोनामुक्त झालेले विलास भांगे यांनी सांगितला. 

राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने धुमाकूळ घातला असतानाच सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुका सुटू शकला नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू झाले. ज्यांना मधुमेह आहे त्या रुग्णांना तर खूपच त्रास झाला. काही दगावले तर काहींनी यशस्वीपणे उपचारास प्रतिसाद देऊन स्वतःचा जीव वाचवला आहे. त्यापैकीच एक आहेत बार्शीचे विलास भांगे. ताडसौंदणे नाक्‍यावर इलेक्‍ट्रिक मोटार रिवाइंडिंग करण्याचा त्यांचा व्यवसाय. वय अवघे 34 वर्षे. आई-वडील, पत्नी, दोन मुले असे एकत्र कुटुंब आहे. कोरोना संसर्गाची भीती वाटत नव्हती. पण व्यवसायामुळे बाधा होण्याची शक्‍यता वाटत होती, असे भांगे "सकाळ'शी बोलताना सांगत होते. 

कोरानाचा प्रादुर्भाव कसा झाला, याबाबत श्री. भांगे म्हणाले, लॉकडाउनमध्ये तर व्यवसाय पूर्ण बंदच होता. तरीही 6 ऑक्‍टोबर रोजी प्रथम पोटात दुखत होते. कोणत्याही डॉक्‍टरांना दाखवले, की शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत होते. त्यामुळे माझी तपासणी ग्रामीण रुग्णालयात झाली. तपासणी अहवालामध्ये कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्या वेळी माझी शुगर 340 असल्याचे स्पष्ट झाले, तर रक्तदाबही वाढला होता. चार दिवस उपचार घेतले. इच्छाशक्ती दांडगी ठेवून कोरोनाचा सामना करायचे ठरवले. प्रकृतीची कोणतीही तक्रार नसताना, कसलाही त्रास झालेला नसताना, आई - वडिलांना शुगर नसताना मला शुगर आढळून आल्याने आश्‍चर्य वाटले. ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. शीतल बोपलकर यांनी रुग्णाचा रक्तदाब, शुगर, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून आटोक्‍यात आणण्यासाठी डॉ. योगेश सोमाणी यांच्या डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर येथे पाठवले. 

सात दिवस डॉ. सोमाणी यांच्या रुग्णालयात उपचार घेत असताना भात आणि कोणताही गोड पदार्थ खाल्ला नाही. बाकी रोजच्याप्रमाणे जेवणाचा डबा घरून येत होता. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवत डॉ. सोमाणी यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनानुसार औषधे वेळेत घेतली. सातच दिवसांत कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आणि घरी परतलो. कोरोना रुग्णाने स्वतःचे मनोबल चांगले ठेवले, वेळेत उपचार केला तर कोरोनावर मात करता येते, असे भांगे यांनी आवर्जून सांगितले. 

श्री. भांगे म्हणाले, माझे बारावीपर्यंत शिक्षण झाले. रोजगार संधीसाठी मुंबई गाठली होती. तेथे कोहिनूर टेक्‍निकल इन्स्टिट्यूटमध्ये मोटार रिवायंडिंग कोर्स पूर्ण केला. परत बार्शीला आलो. चंडक इंडस्ट्रीज, बार्शी टेक्‍स्टाईल मिल येथेही काही दिवस काम केले. पण व्यवसाय करण्याची जास्त इच्छाशक्ती असल्याने 2010 मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करून दुकान उघडले. 

वेळेवर तपासणी व उपचार घेतल्यास व्हाल कोरोनामुक्त 
याबाबत डॉ. योगेश सोमाणी म्हणाले, कोरोना झालेल्या रुग्णाने कधीही घाबरायचे नाही. मधुमेह, न्यूमोनियाचे प्रमाण जास्त असल्याने त्यावर प्रादुर्भाव होऊन रुग्णांना त्रास होतो पण वेळेवर तपासणी केली तर बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. रक्तदाब वाढतो पण मनात भीती नको. सोशल मीडियामधून याविषयी खूप दाखवले जाते, त्यामुळे रुग्ण घाबरतात. रुग्णाची मनाची इच्छाशक्ती, उपचारास प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. भांगे यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन सुद्धा त्वरित उपचारामुळे रुग्ण सुस्थितीत घरी परतला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com