विठ्ठलाच्या गर्भगृहातच मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्याला स्नान! वारकऱ्यांमधून तीव्र नाराजी 

भारत नागणे 
शनिवार, 11 जुलै 2020

गुरुवारी (ता. 9) विठ्ठल-रुक्‍मिणीची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. पूजेआधी देवाला स्नान घालण्यात आले. या वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी देखील गाभाऱ्यात उपस्थित होते. याच वेळी विठ्ठल जोशी देवाचे दर्शन घेत असताना मंदिरातील एका कर्मचाऱ्याने जोशींना देवासमोरच स्नान घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेनंतरची विठ्ठल-रुक्‍मिणीची दोन दिवसांपूर्वीच प्रक्षाळपूजा संपन्न झाली. पूजेचा मान मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना देण्यात आला होता. प्रक्षाळ पूजेच्या वेळी विठ्ठलाला पंचामृत आणि पाण्याने स्नान घालवण्यात आले. त्याच वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशींना देखील देवापुढेच भागाऱ्यात एका कर्मचाऱ्याने स्नान घातले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाविकांमधून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

हेही वाचा : मोठी बातमी! अंतिम वर्षातील "एवढी' मुले म्हणताहेत परीक्षा नको! 

आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना दर्शन देण्यासाठी विठ्ठल-रुक्‍मिणी 24 तास उभे असतात. पौर्णिमेनंतर दर्शन देऊन थकलेल्या देवाचा थकवा दूर करण्यासाठी प्रथा आणि परंपरेनुसार प्रक्षाळ पूजा केली जाते. विविध आयुर्वेदिक वनस्पतींचा काढाही दिला जातो. त्यापूर्वी देवाला पंचामृत आणि पाण्याने स्नान घालून पूजा केली जाते. गुरुवारी (ता. 9) विठ्ठल-रुक्‍मिणीची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. पूजेआधी देवाला स्नान घालण्यात आले. या वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी देखील गाभाऱ्यात उपस्थित होते. याच वेळी विठ्ठल जोशी देवाचे दर्शन घेत असताना मंदिरातील एका कर्मचाऱ्याने जोशींना देवासमोरच स्नान घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा : आनंदाची बातमी; चार दिवसात उजनी धरण येणार "प्लस'मध्ये 

कोरोनामुळे चार महिन्यांपासून विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. अशातच यंदाची आषाढी पालखी सोहळा आणि यात्रादेखील रद्द करण्यात आली. तरीही प्रथा आणि परंपरेनुसार शासकीय महापूजा आणि देवाचे नित्योपचार सुरूच आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देवाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. याच वेळी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यालाही देवाबरोबर स्नान घालण्यात आले. याविषयी भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी आश्‍यर्च व्यक्त करून चुकीची प्रथा सुरू केल्याची टिप्पणी केली आहे. 

चौकशी करून कारवाई करू
याबाबत विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, व्हिडीओ पाहिल्यानंतर देवासमोर कार्यकारी अधिकाऱ्यांना स्नान घातल्याचे दिसत आहे. प्रथा आणि परंपरा जोपासत असताना देवासमोर स्नान करणे चुकीचे आहे. परंतु त्यांनी हे जाणीवपूर्वक केले असावे असे वाटत नाही. तरीही संपूर्ण माहिती घेतली जाईल. दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bathing of the executive officer of the temple committee in the sanctum sanctorum of Vitthal