भागाईवाडीचे नाव झळकले देशाच्या नकाशावर : सरपंच कविता घोडके-पाटील यांची कामगिरी 

kavita ghodke.jpg
kavita ghodke.jpg

सोलापूर : महाराष्ट्रातील विकसनशील गावे, आदर्श गावे, स्मार्ट गावे यांच्या यादीत आता उत्तर सोलापूर तालुक्‍यातील भागाईवाडीचेही नाव समाविष्ठ झाले आहे. भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील यांनी शासनाच्या विविध योजना, लोकसहभाग या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. गावात झालेल्या विकासाला त्यांनी वेबसाईट, मोबाईल ऍपची जोड दिल्याने आज भागाईवाडीचे नाव आज देशाच्या नकाशावर झळकत आहे. 

सरपंच कविता घोडके पाटील यांनी अवघ्या पाच वर्षात भागाईवाडी मध्ये जवळपास तीन कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. शासनाच्या योजनांची गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी झाल्यास आणि शासनाच्या योजनांना लोकसहभाग मिळाल्यास गावामध्ये काय बदल घडू शकतो? याचे मूर्तिमंत उदाहरण सरपंच कविता घोडके-पाटील यांनी भागाईवाडीच्या विकासातून दाखवून दिले आहे. उत्तर सोलापूर, मोहोळ आणि बार्शी तालुक्‍याच्या सीमेवर असलेल्या अवघ्या 778 लोकसंख्येच्या भागाईवाडी गावाने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. 
तीन तालुक्‍याच्या सीमेवर भागाईवाडी असल्याने विकासापासून हे गाव नेहमीच दुर्लक्षित असायचे. आज या गावाने स्मार्ट भागाईवाडी म्हणून आपली ओळख तयार केली आहे. या गावाने स्वतःची वेबसाईट, मोबाईल ऍप विकसित केले आहे. या गावाने तब्बल 22 पुरस्कारांच्या माध्यमातून आपल्या कतृत्त्वावर शिक्कामोर्तब केला आहे. भागाईवाडी गावामध्ये गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी 15 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीचे सुसज्ज कार्यालय, बंदिस्त गटार, सॅनेटरी नॅपकिन, डस्टबिन, सिमेंटचे रस्ते, पेव्हर ब्लॉक, आर. ओ. प्लांट, हायमास्ट अशी भरीव कामे भागाईवाडीत झाली आहेत. गावाच्या पिण्याचा प्रश्‍न सुटला, शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एक कोटी 16 लाख रुपयांचा कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा नागझरी नदीवर मंजूर झाला आहे. या बंधाऱ्यामुळे भागाईवाडीसह परिसरातील वाळूज आणि मुंगशी या गावातील शेतीच्या पाण्याचाही प्रश्‍न सुटणार आहे. 
बार्शी तालुक्‍यातील जवळगाव मध्यम प्रकल्पास केंद्र शासनाच्या योजनेतून 15 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जवळगाव प्रकल्पाच्या कौठाळी ते देगाव मेन फाटा व त्यावरील उप फाटे दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पामुळे कौठाळी, भागाईवाडी, शेरेवाडी, वाळुज, देगाव, साखरेवाडी, मुंगशी या गावातील शेतीला पाणी मिळणार असल्याचे सौ. घोडके-पाटील यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका म्हणून सौ. कविता घोडके-पाटील यांनी 14 वर्ष काम पाहिले. त्यानंतर 2015 मध्ये त्यांना भागाईवाडीच्या सरपंचपदी काम करण्याची बिनविरोध संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे पुरेपूर सोने त्यांनी गावाच्या विकासासाठी केले आहे. महिलेला संधी मिळाल्यास गावाचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो? याचे उत्तम उदाहरण सौ. कविता घोडके पाटील यांनी दाखवून दिले आहे. 

अमिर खानने भागाईवाडीत केले श्रमदान 
अभिनेते अमिर खान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांनी भागाईवाडीत श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या भागाईवाडीमध्ये येऊन आमिर खान व त्यांच्या पत्नी किरण राव, डॉ. सत्यजित भटकळ केलेले श्रमदान हे भागाईवाडीसाठी भाग्याची गोष्ट मानली जात आहे. वॉटर कप स्पर्धेतही भागाईवाडीने केलेली कामगिरी गावाच्या एकजुटीची व सरपंच घोडके यांच्या विकासाच्या दृष्टीची ताकद दाखवून देते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com