भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे निधन 

अभय जोशी 
Monday, 28 September 2020

वा. ना. उत्पात यांच्या वक्तृत्वाची वैशिष्ट्यपूर्ण शैली होती. त्यांनी आपल्या अमोघ आणि सडेतोड भाषणांनी अनेक सभा गाजवल्या होत्या. निर्भिड आणि स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा विशेष गुण होता. सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांचे वाचन आणि लेखन शेवटपर्यत सुरु होते. पंढरपुरातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. पंढरपुरातील अनेक महत्वाच्या सामाजिक घटनांचे ते साक्षीदार होते. 

पंढरपूर (सोलापूर) : प्रसिध्द भागवताचार्य, कट्टर हिंदुत्ववादी विचारवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त वा. ना. उत्पात (वय 80) यांचे पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना आज दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
श्री. उत्पात यांना 13 सप्टेंबर रोजी काहीसा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने 14 सप्टेंबर रोजी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. आज दुपारी त्यांचे निधन झाले. वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांनी कवठेकर आणि द. ह. कवठेकर प्रशालेत शिक्षक म्हणून अनेक वर्षे काम केले. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद तसेच श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. ते कट्टर सावरकर भक्त म्हणून ओळखले जात असत. स्व. अनंतराव आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांचा त्यांना अनेक वर्षे सहवास लाभला. 
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले होते. पंढरपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची त्यांनी स्थापना केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली. त्या व्याख्यानाच्या मानधनातून त्यांनी सावरकर वाचनालयाच्या जागेवर सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन सावरकर क्रांती मंदिराची उभारणी केली आहे. त्याच ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने त्यांनी अभ्यासिका सुरु केली आहे. 
समस्त उत्पात समाजाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांची वक्तृत्वाची वैशिष्ट्यपूर्ण शैली होती. त्यांनी आपल्या अमोघ आणि सडेतोड भाषणांनी अनेक सभा गाजवल्या होत्या. निर्भिड आणि स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा विशेष गुण होता. सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांचे वाचन आणि लेखन शेवटपर्यत सुरु होते. पंढरपुरातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. पंढरपुरातील अनेक महत्वाच्या सामाजिक घटनांचे ते साक्षीदार होते. प्रहार नावाने त्यांनी अनेक वर्षे साप्ताहिक चालवले. अभिजात शास्त्रीय गायनाचा प्रसार करणाऱ्या स्वरसाधना या संस्थेची त्यांनी स्थापना केली. उत्पातांच्या लावणीला त्यांच्या निवेदनाची अमोघ जोड होती. 
सुमारे पस्तीस वर्षे त्यांनी येथील श्री रुक्‍मीणी मंदिरात भागवत कथा तर संत गजानन महाराज मंदिरात तब्बल पंचवीस वर्षे ज्ञानेश्वरी सांगितली. अनेक विषयांवर त्यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत. 
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते. अनेक विषयांवरचा त्यांचा व्यासंग होता. अल्पशा आजाराने झालेल्या त्यांच्या निधनामुळे पंढरपूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. (कै.) उत्पात यांच्या पश्‍चात मुलगा माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhagavatacharya Vasudev Utpat passed away