भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्‍नचिन्ह ! 42.82 लाखांची पाणीपट्टी थकीत 

हुकूम मुलाणी 
Friday, 12 February 2021

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील 39 गावांत सुमारे 42 लाख 82 हजार 168 रुपयांची पाणीपट्टी थकबाकी असल्याने या योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मंगळवेढा (सोलापूर) : भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील 39 गावांत सुमारे 42 लाख 82 हजार 168 रुपयांची पाणीपट्टी थकबाकी असल्याने या योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या प्रयत्नातून 39 दुष्काळी गावातील मजूर महिलेच्या डोक्‍यावरील पाण्याचा हंडा कमी करण्याच्या दृष्टीने लोकवर्गणीची अट रद्द करून 39 गावांसाठी भोसे पाणीपुरवठा योजना आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून राबविण्यात आली. या गावाला ऐन उन्हाळ्यात तीन झोनद्वारे घरा- घरांत नळाद्वारे पाणी उपलब्ध झाल्यामुळे या भागातील 39 गावांत गेल्या तीन वर्षांत टॅंकर पूर्णपणे बंद झाला. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे योजना हस्तांतरित करण्यापूर्वी जवळपास 40 गावात 42 लाख 82 हजार 168 रुपयांची पाणीपट्टी थकली. परंतु या ग्रामपंचायतीने पाणीपट्टी आकारणी करून देखील भरली नाही. 

दुष्काळामध्ये दिवंगत आमदार भालके यांनी पाणीपट्टी वसुलीबाबत जबरदस्ती करू नये, असे आवाहन केले होते. परंतु त्यावरही ग्रामपंचायतीने पाणीपट्टी न भरल्यामुळे थकबाकी वाढत गेली. त्यामुळे ही योजना चालवणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अशक्‍य झाल्यामुळे त्यांनी ही योजना जि.प.कडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या बंद योजनेतील तांत्रिक बिघाड, वीज बिल आणि कार्यान्वित यंत्रणेसाठी निधी आदींसाठी तरतूद केली असली तरी ग्रामपंचायतीने थकबाकी भरणे आवश्‍यक आहे; अन्यथा नंदूर व आंधळगाव योजनेसारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही. 

ग्रामपंचायतनिहाय थकबाकी पुढीलप्रमाणे... 

  • गोणेवाडी झोन : खडकी (59346), जुनोनी (152928), पाठखळ (194356),मेटकरवाडी (70470), हिवरगाव (73872), शिरसी (35089), गोणेवाडी (268650), हाजापूर (63536), डोंगरगाव (198450), खुपसंगी (231303), लेंडवे चिंचाळे (46332). 
  • नंदेश्वर झोन : सिद्धनकेरी (48330), जालिहाळ (39528), रड्डे (38448), लक्ष्मीनगर (रड्डे) (58752), चांभारवाडी (172368), भोसे (67230), जित्ती (28512), हुन्नूर (149688), मानेवाडी (112946), बावची (73548), शिरनांदगी (46224), चिक्कलगी (28836), निंबोणी (109890), नंदेश्वर (285638), गावठाण (नंदेश्वर) (81972), भाळवणी (164430), महमदाबाद हु (136890), लोणार (82836), पडोळकरवाडी (20930). 
  • भुयार झोन : सलगर खु (6048), येळगी (51991), सोड्डी (34992), जंगलगी (115020), पौट (55144), हुलजंती (267840), माळेवाडी (40370), मारोळी (137030), होनमुखे वस्ती (मारोळी) (39960), लवंगी (76626), सलगर बु (144396), गावठाण सलगर बु (20628), आसबेवाडी (59940), शिवणगी (43221). 

योजनेतील गावात नवीन सरपंच निवडीनंतर शिखर समिती स्थापन केली जाणार आहे. योजना सुरू होण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया झाली असून, लवकरच या योजनेचे पाणी सुरू होणार असले तरी या योजनेतील पाणी कायम मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने थकबाकी भरणे आवश्‍यक आहे. त्यामुळे पाणी सातत्याने पुरवणे शक्‍य होणार आहे. 
- राजकुमार पांडव, 
उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, मंगळवेढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bhose Regional Water Supply Schemes water bills were in arrears