जिल्हा बॅंकेचा मोठा निर्णय ! नव्या शेतकरी सभासदांना मिळणार पीक कर्ज; 334 विकास सोसायट्यांमधून होणार कर्जवाटप

तात्या लांडगे
Wednesday, 20 January 2021

बॅंकेची स्थिती सुधारल्यानंतर वाढणार कर्ज मर्यादा 
बॅंकेला शंभर वर्षांचा उज्वल परंपरा असून शेतकऱ्यांची बॅंक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा नावलौकिक आहे. त्यामुळे ज्या शेतकरी सभासदांना मागील सात वर्षांत अथवा आजवर कर्जच मिळाले नाही, त्यांना पीक कर्ज दिले जाणार आहे. तर ज्यांची कर्जमर्यादा 50 हजारांपर्यंतच होती, त्यांनाही पीक पाहून एक लाखांपर्यंत पीक कर्ज दिले जाईल. त्यात टप्प्याटप्याने वाढ करण्याचे नियोजन आहे. 
- शैलेश कोथमिरे, प्रशासक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक 

 सोलापूर : सात वर्षांपूर्वी बंद पडलेले नव्या शेतकऱ्यांचे कर्जवाटप पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने घेतला आहे. जिल्ह्यातील नव्या शेतकरी सभासदांना 70 ते 80 कोटी रुपयांपर्यंत कर्जवाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा, मोहोळ, अक्‍कलकोट, माढा, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्‍यातील विकास सोसायट्यांची निवड बॅंकेने केली आहे.

बॅंकेची स्थिती सुधारल्यानंतर वाढणार कर्ज मर्यादा 
बॅंकेला शंभर वर्षांचा उज्वल परंपरा असून शेतकऱ्यांची बॅंक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा नावलौकिक आहे. त्यामुळे ज्या शेतकरी सभासदांना मागील सात वर्षांत अथवा आजवर कर्जच मिळाले नाही, त्यांना पीक कर्ज दिले जाणार आहे. तर ज्यांची कर्जमर्यादा 50 हजारांपर्यंतच होती, त्यांनाही पीक पाहून एक लाखांपर्यंत पीक कर्ज दिले जाईल. त्यात टप्प्याटप्याने वाढ करण्याचे नियोजन आहे. 
- शैलेश कोथमिरे, प्रशासक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक 

जिल्ह्याच्या अर्थकारणात तब्बल शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या सोलापूर जिल्हा बॅंकेचे मोठे योगदान राहिले आहे. मात्र, कर्जवाटपातील अनियमिततेमुळे बॅंक अडचणीत आली आणि बॅंकेवर प्रशासक नियुक्‍त करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. प्रशासकाच्या माध्यमातून शेती व बिगरशेती कर्जाची थकबाकी वसुली चांगली झाली. त्यातच कर्जमाफीतून बॅंकेला सहाशे कोटींची रक्‍कम मिळाली. बॅंकेची आर्थिक स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून बॅंकेने आता सात वर्षांपासून बंद असलेले नवे कर्जवाटप पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बॅंकेचे सभासद असतानाही ज्या शेतकऱ्यांना आजवर कर्ज मिळाले नाही, अशांना व जुन्या कर्जदारांना 20 ते 50 हजारांपर्यंतच कर्ज मिळायचे, त्यांनाही आता एक लाखांपर्यंत पीक कर्ज मिळणार आहे. त्यासाठी ज्या विकास सोसायट्यांची बॅंक पातळीवरील कर्जवसुली 100 टक्‍के (30 जून 2020 पर्यंत) आहे आणि संस्था पातळीवरील कर्जवाटप 50 टक्‍क्‍यांहून अधिक आहे, अशा 334 सोसायट्यांची निवड केली आहे. त्यात मंगळवेढ्यातील 10, दक्षिण सोलापुरातील पाच, उत्तर सोलापुरातील सात, करमाळ्यातील 38, मोहोळमधील 25, अक्‍कलकोटमधील तीन, बार्शीतील पाच, माढ्यातील 53, माळशिरसमधील 79, सांगोल्यातील 52 आणि पंढरपुरातील 57 सोसायट्यांचा समावेश आहे. 

जिल्हा बॅंकेची सद्यस्थिती 

  • एकूण कर्जदार शेतकरी 
  • 1,39,212 
  • थकबाकीदार शेतकरी 
  • 35,083 
  • शेती कर्जाची थकबाकी 
  • 756 कोटी 
  • शेतकऱ्यांकडील कर्जाची येणेबाकी 
  • 1100.65 कोटी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big decision of District Bank! New farmer members to get crop loans; Loans will be disbursed from 334 development societies