कुंभेज येथील पक्ष्यांच्या शाळेत "चष्मेवाला'चा मुक्काम ! वाचा या पाखरूची वैशिष्ट्ये

White eye
White eye

केत्तूर (सोलापूर) : निसर्गाचे आणि मानवाचे नाते खूपच पक्के असताना आधुनिक काळात मात्र ते वरचेवर सैल होत असल्याचेच दिसून येत आहे. असे असतानाच, कुंभेज (ता. करमाळा) येथील भारतराव शिंदे यांच्या परसबागेतील झाडावर सकाळ-संध्याकाळ व दिवसभर विविध पक्ष्यांची जणू काही शाळाच भरते. यात एक वेगळाच पक्षी श्वेता शिंदे यांना दिसला. तो सीताफळाच्या झाडावरील सीताफळाचा मनसोक्त आनंद घेत होता. डोळ्याभोवती पांढरे वर्तुळ असणारा हा "चष्मेवाला' अर्थात गारडोळ्या किंवा गाऱ्या पाखरू. 

श्वेतनेत्राचा हा चिमुकला पक्षी व्हाईट आय (White eye) या इंग्रजी नावाने ओळखला जातो. रूपरंगाने सुंदर असलेला व चिमणीपेक्षा आकाराने लहान असणारा हा पक्षी ऋतुमानानुसर स्थलांतर करतो. देशामध्ये हा पक्षी वाळवंटी प्रदेश सोडून सर्वत्र आढळून येतो. 

भारतीय मूळ निवासी असलेला हा पक्षी आशिया खंडातील इंडोनेशिया, मलेशिया, कराची आदी उष्ण खंडातील जंगलात स्थलांतर करून जातो. कोळी, कीटक, फुलांतील मधुरस व फळांतील गर हे याचे मुख्य खाद्य असते. हा फक्षी झाडाझुडपांत राहतो व जमिनीवर अतिशय कमी प्रमाणावर दिसतो. साधारणतः आठ ते नऊ सेंटिमीटर लांबी असते. नर व मादी एकसारखे दिसतात. खाद्य टिपण्यासाठी या पक्ष्यामधील चोच छोटी, बाकदार व अती तीक्ष्ण असते. या पक्ष्याचा आवाज म्हणजे बांगड्यांचा किणकिणाटच. याच्यातील आवाज सुरवातीला अस्पष्ट असतो; मग तो हळूहळू एक विशिष्ट उंची गाठतो. 

या पक्ष्याचा प्रजनन काळ 
एप्रिल ते जुलै या काळात या पक्ष्याचा प्रजननकाळ असतो. झाडावरील फांदीवर कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले लहान घरटे हे बांधतात व प्रजनन होते. अंडी फिकट निळ्या रंगाची, टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात, वाढवतात व इतर कामेही दोघे मिळून करतात. 

या पक्ष्याबाबत पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार म्हणाले, हिवाळा व उन्हाळा या काळात हे पक्षी दहा-बारा संख्येने माणसांच्या घरांभोवती असलेल्या परसबागेत हमखास वावरताना दिसतात. चष्मेवाला हा पक्षी लवकर माणसाळणारा आहे. या वर्षी बरसलेल्या उत्तम पावसामुळे झाडाझुडुपांना फळं लगडलेली आहेत. चष्मेवालासारख्या पक्ष्यांबरोबर इतर चिमुकल्या पक्ष्यांनाही मुबलक खाद्य उपलब्ध झाले आहे. 

कुंभेज (ता. करमाळा) येथील पक्षीमित्र कल्याणराव साळुंके म्हणाले, "करमाळा तालुक्‍यातील उजनी लाभक्षेत्रात विविध प्रकारचे अनेक पशूपक्षी दरवर्षी येतात. ऋतुमानानुसार त्यांची जा-ये सुरू असते. काही पक्षी तर हजारो मैलांचे अंतर पार करून उजनी जलाशयावर हजेरी लावतात. या सर्व पक्ष्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com