esakal | पंढरपूर पोटनिवडणुकीत ट्‌विस्ट ! भाजपकडून आमदार प्रशांत परिचारक स्वत: इच्छुक; समाधान आवताडे अपक्ष लढणार 

बोलून बातमी शोधा

PDR Twist

अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधात सक्षम व प्रभावी उमेदवार म्हणून भाजपकडून आमदार प्रशांत परिचाकांचे नाव चर्चेत असून, परिचारक स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीत ट्‌विस्ट ! भाजपकडून आमदार प्रशांत परिचारक स्वत: इच्छुक; समाधान आवताडे अपक्ष लढणार 
sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधात सक्षम व प्रभावी उमेदवार म्हणून भाजपकडून आमदार प्रशांत परिचाकांचे नाव चर्चेत असून, परिचारक स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. 

राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे नाव जवळपास निश्‍चित केल्याची खात्रीशीर माहिती आहे. तर संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे अपक्ष म्हणून पुन्हा आपले नशीब आजमावण्याची शक्‍यता आहे. पोट निवडणुकीमध्ये परिचारक- भालके- आवताडे अशी तिरंगी लढत जवळपास निश्‍चित मानली जात आहे. 

पोटनिवडणुकीसाठी उद्यापासून (ता. 23) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यापूर्वीच सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीच्या संदर्भाने हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. 19) कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उमेदवारी संदर्भात प्राथमिक चाचपणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळेल, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने नाव न छापण्याच्या आटीवर आज दिले आहेत. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या भाजपच्या गोटातही आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुरवातीला परिचारक निवडणूक लढवण्याच्या मन:स्थितीत नव्हते; मात्र कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावामुळे अखेर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. याच संदर्भात रविवारी (ता. 21) परिचारक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक देखील झाली. त्यामध्ये आमदार प्रशांत परिचारकांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारकांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपच्या संपर्कात असलेल्या समाधान आवताडे यांनीही आता अपक्ष निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे यांनी आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात चांगली लढत दिली होती. मंगळवेढा तालुक्‍यातून समाधान आवताडे यांनी दोन्ही उमेदवारांपेक्षा पाच हजार मते अधिक घेतली होती. त्यामुळे श्री. आवताडे यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. समाधान आवताडे हे अपक्ष निवडणूक लढवण्याची दाट शक्‍यता आहे. 

भाजपकडून प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळाली तर भालके, परिचारक आणि आवताडे यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. मागच्या निवडणुकीत आमदार भारत 
भालके यांनी ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा जवळपास 10 हजाराहून अधिक मताधिक्‍याने पराभव केला होता. समाधान आवताडे तिसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या दीड वर्षामध्ये मतदारसंघात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल