युरियाच्या कृत्रिम टंचाईविरोधात भाजपचे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

BJP.
BJP.

सोलापूर : जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्याने शेतकरी आनंदी आहेत. असे असताना खत विक्रेत्यांकडून जाणीवपूर्वक खतांचा तुटवडा दाखवून खताची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी व खतांचा काळाबाजार थांबविण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले. 

निवेदन देण्यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वमी, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, अमरसिंह शेंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. जिल्ह्यात शेतकऱ्यांची लूट होत असताना सरकार मात्र याबाबत काहीच करत नसल्याचा आरोपही या वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कृषी विभागाने यात लक्ष घालून हा प्रश्‍न सोडविण्याची मागणीही त्यांनी केली. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. प्रत्येक तहसीलदारांना युरियाची कृत्रिम टंचाई कमी करण्याबाबत तालुक्‍याच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदने दिली आहेत. 

भाजपचे मोहोळ तहसीलसमोर धरणे आंदोलन; कारवाईची मागणी 
मोहोळ तालुक्‍यातील खत विक्रेते व कृषी विभागातील काही अधिकारी यांच्या संगनमताने तालुक्‍यात युरियाचा मोठ्या प्रमाणात कृत्रिम तुटवडा केला जात आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. याप्रकरणी शासन व कृषी विभागाच्या निषेधार्थ मोहोळ तालुका भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात उडीद, तूर, मटकी, बाजरी, मका, कांदा आदी पिकांची पेरणी केली आहे. पाऊस जादा झाला तर पिके हातची जाऊ नयेत म्हणून या पिकांना खतांची मात्रा देणे आवश्‍यक असते. ही परिस्थिती असताना तालुक्‍यातील खतविक्रेते व कृषी विभाग यांच्या संगनमताने युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण करून त्याची चढ्या भावाने विक्री केली जात आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला बनावट कांदा बियाणे, न उगवलेले सोयाबीन बियाणे, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, तालुक्‍यातील काही दुकानदारांनी बनावट खतांची केलेली विक्री, ढासळलेले दुधाचे दर या संकटांचा शेतकरी सामना करीत आहेत. मात्र शासनाकडून याबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. खताचा तुटवडा निर्माण करून युरियासह अन्य खते जादा दराने शेतकऱ्यांना खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. या सर्व बाबींची चौकशी पथकाद्वारे करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

या वेळी संजीव खिलारे, नगरसेवक सुशील क्षीरसागर, रामचंद्र खांडेकर, लक्ष्मण कृपाळ, सुरेश राऊत, रमेश माने, महेश झेंडगे, तानाजी दळवे, रामदास झेंडगे, अजय गावडे, महादेव माने, बाळासाहेब पाटील, गणेश झाडे, गणेश भोसले, गुरुराज तागडे, जालिंदर खंदारे, शशीकांत दळवे, विष्णू चव्हाण, गुलाब देशमुख, बुऱ्हाण रेणापुरे, महेश राऊत, संजय दळवे, भारत आवारे, अभिजित दळवी, गणेश काळे उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com