ब्रेकिंग : भाजप समर्थक आमदार व शिवसेना नेत्यात फ्री स्टाइल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

बार्शी (सोलापूर) : शहरातील मुख्य रस्ता सोमवार पेठेतील जैन मंदिराजवळ भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत व शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यात फ्री स्टाइल समोरासमोर खडाजंगी झाली. शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन 10 मिनिटांतच शहर बंद होऊन शुकशुकाट झाला. पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

बार्शी (सोलापूर) : शहरातील मुख्य रस्ता सोमवार पेठेतील जैन मंदिराजवळ भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत व शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यात फ्री स्टाइल समोरासमोर खडाजंगी झाली. शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन 10 मिनिटांतच शहर बंद होऊन शुकशुकाट झाला. पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

दोघेही आले समोरासमोर 
शहरातील सोमवार पेठ येथे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी स्वतःच्या जागेत आज नवीन ज्यूस सेंटरचे उद्‌घाटन केले. आमदार राजेंद्र राऊत रात्री पावणेनऊच्या दरम्यान तिथे आले. सोमवार पेठेत नवीन ज्यूस सेंटर समोरच शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर मागील एक वर्षापासून सामान्य जनतेसाठी अन्नदान कार्यक्रम सायंकाळी सहा ते नऊपर्यंत करतात आणि त्या वेळी ते स्वतः उपस्थित असतात. आमदार राऊत ज्यूस सेंटरमधून स्वतःच्या वाहनामध्ये बसत असताना आंधळकर यांच्याशी नजरानजर झाली. त्यावेळी शाब्दिक चकमक दोघांत झाली. परत समोरासमोर खडाजंगी झाली. 

बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली 
ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच वातावरण तणावपूर्ण झाले. सर्व दुकाने पटापट बंद झाली. शहरातील पोलिस अधिकारी, कर्मचारी चौकात बंदोबस्तासाठी हजर झाले. सोमवार पेठ, भोसले चौक येथे बंदोबस्त लावण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नसून पोलिस उपअधीक्षक सिद्धेश्‍वर भोरे, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी परिस्थितीवर निरीक्षण ठेवून आहेत.  

प्रक्रिया देण्यास नकार 
दरम्यान, याबाबत आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी काही प्रक्रिया देण्यास नकार दिला. 

किरकोळ बाचाबाची 
अवैध मटका, दारू याबाबत आम्ही उपोषण केले होते. त्याची माहिती मागवली होती. अध्यक्षांच्या दुकानसमोर आमचे अन्नछत्र आहे. आमदार आले होते. किरकोळ बाचाबाची झाली होती. जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले. 
- भाऊसाहेब आंधळकर, 
शिवसेना नेते, बार्शी
 

शहरातील परिस्थिती शांत 
बार्शी शहरात परिस्थिती शांत आहे. अजूनपर्यंत तक्रार देण्यास कोणीही आलेले नाही. घटना घडली हे सत्य आहे. बंदोबस्त लावण्यात आला असून नियंत्रण असल्याने शांतता आहे. 
- संतोष गिरीगोसावी, 
पोलिस निरीक्षक, बार्शी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking: Freestyle among pro-BJP MLAs and Shiv Sena leaders