बजेट राज्याचे, टेन्शन सोलापूरचे 

प्रमोद बोडके
Wednesday, 11 March 2020

अमित देशमुखांनी घेतली बैठक 
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी मराठवाडा वॉटरग्रीड संदर्भात 9 मार्च रोजी लातूरमध्ये बैठक घेतली. उजनीचे पाणी धानेगाव मार्गे हे पाणी लातूरला नेले जाणार आहे. उजनीचे पाणी लवकरात लवकर लातूरला नेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. उजनीचे पाणी मराठवाड्याला नेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्‍यात कामे प्रगतिपथावर सुरू असल्याचेही समजते. 

सोलापूर : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात बोरामणी विमानतळ वगळता सोलापूरला काय मिळाले? याचा शोध अद्यापही सोलापूर घेत आहेत. उजनीचे पाणी मराठवाड्याला नेण्यासाठी याच राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद झाल्याने सोलापूरकरांचे टेन्शन मात्र वाढले आहे. 
हेही वाचा - "या' महापालिकेत कॉंग्रेसच्या खेळीने भाजपचा सभापती 
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाईग्रस्त तालुक्‍यांसाठी उजनी व जायकवाडी धरणातून प्रकल्प निश्‍चित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 2020-21 वर्षाकरिता 200 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. उजनीचे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी राज्य सरकार एकीकडे तरतूद करत असताना दुसरीकडे मात्र कृष्णा व नीरा खोऱ्यातील पाणी उजनीत आणण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे येत्या काळात सोलापूरकरांच्या तोंडचे पाणी पळण्याची दाट शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला व मंगळवेढा तालुक्‍याला आवश्‍यक असलेले पाणी याची गरज अद्यापही कायम आहे. 
हेही वाचा - आठ जिल्ह्यांमध्ये घरफोड्या! वयाच्या 15 वर्षी पहिली चोरी अन्‌ आता... 
या तालुक्‍यांच्या योजनांचा पाणीप्रश्‍न कायम असतानाच आता मराठवाड्यासाठी उजनीतून पाणी नेण्यासाठी युद्ध पातळीवर कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील उजनीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. सोलापूर शहराला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर सुरू आहो. सध्या या जलवाहिनीचे सीमांकन, मूल्यांकन व कृषी पंचनाम्याचे काम करण्यात येत आहे. ही जलवाहिनी कार्यान्वित झाल्यास सोलापूरला पिण्यासाठी भीमा नदीत सोडले जाणारे पाणी बंद होणार आहे. भीमा नदीवर अवलंबून असलेली गावे, शेतकरी, साखर कारखानदार यांना भविष्यात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget State, Tension Solapur