आठ जिल्ह्यांमध्ये घरफोड्या ! वयाच्या 15 व्या वर्षी पहिली चोरी अन्‌ आता... 

theif
theif

सोलापूर : राज्यातील सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, औरंगाबाद व नगर जिल्ह्यात तब्बल 600 गुन्हे केलेला कुविख्यात गुन्हेगार राजेंद्र शिवाजी बाबर (वय- 50, रा. किकली, जि. सातारा) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील आसनगाव हे असून त्याने चोरीच्या पैशातून कोल्हापूर, सोलापूरसह अन्य ठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला गुन्हा केला आणि वयाच्या 50 वयापर्यंत त्याच्यावर 600 गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये त्याचा भाऊ महेश बाबर याचाही समावेश असून तो सध्या फरार आहे. तत्पूर्वी, आरोपींनी सातारा व सोलापूर येथे पोलिसांवर गोळीबारही केला होता. 


सोने तारणचा फलक पाहून फोडली साताऱ्यातील आयडीबीआय बॅंक

 
सातारा जिल्ह्यातील फलटण हद्दीत रस्त्यालगत असलेल्या आयडीबीआय बॅंकेबाहेर सोने तारणावर कर्ज मिळेल, असा फलक लावला होता. तो फलक पाहून आरोपी राजेंद्र बाबरला वाटले की, बॅंकेत सोने खूप असेल. त्यासाठी त्याने विटा येथे जावून गॅस कटर मशिनची चोरी केली. चोरीपूर्वी बॅंकेत जावून बॅंकेत प्रवेश करण्याची माहिती मिळविली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री वाहनाच्या जॅकद्वारे खिडकीचे ग्रिल तोडले आणि बॅंकेत प्रवेश केला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही तिजोरी फुटत नसल्याने आरोपीचा भाऊ महेश बाबर व राजकुमार पंडित तिथून निघून जाण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी, त्यांनी राजेंद्रला कल्पना दिली. मात्र, राजेंद्र याने चोरी करुनच बाहेर पडा असे सांगितल्यानंतर त्यांनी तिजोरी फोडली आणि त्यातून तब्बल 80 लाखांचे सोने गायब केले. 

मामाच्या शेतात वितळवायचा चोरीचे सोने 


घरफोडी, बॅंक चोरी करुन मिळालेले सोने आरोपी राजेंद्र बाबर व महेश बाबर हे त्याचे मामा (रा. कोरेगाव, जि. सातारा) यांच्या शेतात मशिनच्या सहायाने वितळवायचे. त्यासाठी आरोपींनी स्वतंत्र मशिन खरेदी केली आहे. पोलिसांनी मशिनसह आरोपींना ताब्यात घेतले आहे. वितळवलेले सोने विक्रीतून मिळालेल्या रकमेतून आरोपींनी जमिनी खरेदी केल्या आहेत. 


चौथीपर्यंतच झाले आहे शिक्षण 


पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, औरंगाबाद, नगर या जिल्ह्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी करणारा आरोपी राजेंद्र बाबर याचे वडिल सेवानिवृत्त मिलिटरी मॅन आहेत. आरोपी राजेंद्र याचे शिक्षण चौथीपर्यंत झाले असून त्याची सासरवाडी (बार्शी, जि. सोलापूर) येथे आहे. त्याच्या दोन मुली महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. आरोपीचे शिक्षण चौथीपर्यंतच झाले असून त्याने वयाच्या 15 व्या वर्षी चोरीचा पहिला गुन्हा केल्याची नोंद पोलिसांमध्ये आहे. वयाच्या 50 वर्षांत तो 15 वर्षे जेलमध्ये राहून आला असतानाही चोरीचा व्यवसाय त्याने सोडला नाही. त्याचा मित्र राजकुमार पंडित विभुते (रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) याला गॅस कटिंगची माहिती असल्याने त्याने त्याला सोबत घेतले. त्यांच्या साथीला राजेंद्रचा भाऊ महेश हाही होता. तिघांनी मिळून चोरीचा व्यवसाय सुरु केला आणि चोरीच्या व्यवसायातून मिळालेल्या रकमेतून आरोपींनी कोल्हापूर, सोलापूरसह अन्य ठिकाणी जमिनीसह अन्य स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती पोलिस तपासांत समोर आली आहे. 


चोरीच्या वाहनातून करायचा चोरी 


कोणत्याही शहरात घरफोडी करण्यापूर्वी आरोपी राजेंद्र बाबर, महेश बाबर हे त्या भागातील एखादी चारचाकी चोरी करायचे. पोलिसांना कोणतीही खबर लागू नये या हेतूने त्या वाहनातून ते प्रवास करत होते. आरोपीकडून सोलापूर जेलरोड पोलिसांनी चारचाकी, ऑक्‍सीजन वाडचे एक सिलेंडर, पितळी धातुचे ऑक्‍सीजन रेग्यूलेटर, स्टीलचे पांढऱ्या रंगाचे रेग्यूलेटर, धातुची काळ्या रंगाची कटावणी, बोल्ट कटर, तीन लहान- मोठे स्क्रू ड्रायव्हर, एक्‍सा ब्लेड, स्टीलचे पाने, पितळीचा गॅस वॉल, दोन लोखंडी गॅस पाईप, लोखंडी कोयते असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्‍त कमलाकर ताकवले यांच्या सूचनांनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांना आरोपी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील केगाव हद्दतील जय भवानी हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, पोलिस हेड कॉन्स्टेबल आबा थोरात, अविनाश शिंदे, तिमीर गायकवाड, दिपक डोके, प्रकाश राठोड, योगेश बेर्डे, अमोल यादव, राजकुमार वाघमारे, धनाजी बाबर, दिलीप विधाते, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, समाधान मारकड, अभिजित पवार, विनोद बनसोडे, कुंदन खटके, शशिकांत धेंडे, राज मुदगल यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com