बुलडाणा, सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती करते दबावाखाली काम, सोमेश क्षीरसागर यांचा आरोप 

प्रमोद बोडके
Tuesday, 15 December 2020


आठ दिवसात सुनावणी 
आमदार माने यांचे चिरंजीव तेजस व भाऊ सोपान यांच्या विरोधात क्षीरसागर यांनी दाखल केलेला अर्ज आम्हाला मिळाला आहे. सध्या आमच्या समोर ग्रामपंचायत निवडणूक आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक असलेले दाखले देण्याचे काम सुरु आहे. समितीच्या इतर सदस्यांकडे असलेला अतिरिक्त पदभार यामुळे क्षीरसागर यांच्या अर्जावर कार्यवाही करण्यास विलंब होत आहे. येत्या आठ दिवसात याप्रकरणी सुनावणीची तारीख दिली जाईल. 
- भा. ऊ. खरे, सदस्य सचिव, बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती 

सोलापूर : मोहोळचे (जि. सोलापूर) राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबद्दल मी बुलडाणा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केलेल्या तक्रारीवर समितीने वेळ काढूपणा केला. माझे वडील शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीवर सोलापूरची जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मात्र लगेच कार्यवाही करते. सामाजिक न्याय या एकाच विभागात येणाऱ्या दोन समित्या राजकिय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे. समित्या दबावाखालीच काम करत असतील तर आम्हीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे जाऊ, त्यांना आमची कैफियत सांगू असा इशारा सोमेश क्षीरसागर यांनी दिला आहे. 

क्षीरसागर म्हणाले, आमदार यशवंत माने यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल बुलडाणा समितीकडे मी तक्रार केली. पुर्ननिर्णयाचे आम्हाला अधिकार नसल्याचे सांगून त्यांनी माझी तक्रार फेटाळली. त्यानंतर मी आमदार माने यांचा मुलगा तेजस व भाऊ सोपान यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र बद्दल 13 नोव्हेंबरला तक्रार केली. त्या तक्रारीवर अद्यापही बुलडाणा समितीने अद्यापही कार्यवाही केली नाही. नागनाथ क्षीरसागर यांच्याविरोधात आमदार माने यांचे बंधू हनुमंत यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर लगेच कार्यवाही केली. 

त्यानंतर पेनूरचे (ता. मोहोळ) राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे यांनी 8 डिसेंबरला तक्रार दिली आणि 16 डिसेंबरला सोलापूर समितीने सुनावणी ठेवली. सोलापूरच्या समितीची ही तत्परता आणि बुलडाणा समितीचा वेळ काढूपणा संशयास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. क्षीरसागर परिवारातील माझ्यासह संजय क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, संजना क्षीरसागर आणि राहुल क्षीरसागर यांच्या जात प्रमाणपत्रावर सोलापूरच्या जात पडताळणी समितीने गृह चौकशी केली आहे. तरी देखील नागनाथ क्षीरसागर यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल तक्रारी केल्या जातात या तक्रारीवर सोलापूरची समिती तत्काळ कार्यवाही करते हे विशेष असल्याचे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले. 

खासगी कारखान्यासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी 
आमदार माने यांचे बंधू सोपान यांनी इंदापूर तालुक्‍यातील हरणेश्वर ऍग्रो प्रोडक्‍टस्‌ या खासगी गूळ कारखान्यासाठी बुलडाणा समितीकडून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविले आहे. आजपर्यंत निवडणूक, शिक्षण या कारणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जात होते परंतु खासगी कारखान्यासाठी जात प्रमाणपत्राची मागणी हे अजब आहे. बुलडाणा समितीनेही सोपान यांना प्रमाणपत्र दिल्याचे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले. 

आमच्या प्रमाणपत्राबद्दल यापूर्वीही तक्रारी 
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम, प्रमोद गायकवाड, हुकुमचंद भलानी, दादाराव पवार यांनी माझ्यासह संजय क्षीरसागर, संजना क्षीरसागर, राहुल क्षीरसागर यांच्या प्रमाणपत्राबद्दल सोलापूरच्या समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारींमध्ये पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत गृह चौकशी झाली आहे. त्यानंतर आमच्या बाजूने 2018 मध्ये समितीने निर्णय दिला आहे. नागनाथ क्षीरसागर यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांनी नव्या प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जात निकालाची माहिती दिली आहे. कोणतीही माहिती दडविलेली नाही. त्यानंतर त्यांना जात प्रमाणपत्र मिळाले असल्याचे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buldana, Solapur Caste Certificate Verification Committee works under pressure, alleges Somesh Kshirsagar