अर्रार्र ! जिल्हाधिकारी उचलेनात भाजप आमदाराचा कॉल 

तात्या लांडगे
सोमवार, 16 मार्च 2020

  • माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितला अनुभव 
  • सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार सुरुच 
  • आमदार विजयकुमार देशमुखांनी घेतली व्यापाऱ्यांची बैठक 
  • शेतकरी, व्यापारी, कर्मचाऱ्यांना मास्क घालण्याच्या सूचना : सॅनिटरी लिक्‍विड ठेवण्याचेही आवाहन 

सोलापूर : 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चालू ठेवावी की बंद करावी, या निर्णयासाठी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना चारवेळा कॉल केला. मात्र, एकदाही उत्तर मिळाले नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, बाजार समिती सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची कोंडी ! वस्तीगृहे अन्‌ ग्रंथालयांना कुलूप 

पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने सोलापुरात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जमाव बंदीचे आदेश काढले आहेत. शहरांमधील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील अध्यापन बंद केले असून वस्तीगृहांनाही टाळे ठोकण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती सुरु ठेवायची की बंद, याचे मार्गदर्शन घेण्याच्या उद्देशाने बाजार समितीचे सभापती तथा आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कॉल केले. मात्र, एकाही कॉलला उत्तर न मिळाल्याने देशमुख यांनी बाजार समितीतील व्यापारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर त्यांना शेतमालाचे पैसे देऊन तत्काळ पाठवावे, बाजार समितीत गदी करु नये, अशा सूचना त्यांनी व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. 

हेही नक्‍की वाचा : अर्रार्र मोदी सरकार ! आवास योजनेनंतरही 20 लाख लाभार्थी बेघरच 

सभापती विजयकुमार देशमुख म्हणाले... 

  • प्रत्येक व्यापाऱ्यांनी गाळ्यात सॅनिटरी लिक्‍विड अन्‌ मास्क ठेवावे 
  • बाजार समिती परिसराची दिवसातून तीनवेळा स्वच्छता करावी 
  • जंतुनाशक औषधांचा तुटवडा : औषधांच्या पुरवठ्याकडे कोणाचेही नाही लक्ष 
  • बाजार समितीत गर्दी करु नये : शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री केल्यानंतर तत्काळ पाठवावे 
  • शेतमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत मास्क देण्याचे नियोजन 

हेही नक्‍की वाचा : तुरुंगातील 60 हजार कैद्यांची होणार वैद्यकीय तपासणी 

अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना द्यावा प्रतिसाद 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु की बंद ठेवायची, याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना चारवेळा कॉल केला. मात्र, त्यांच्याकडून एकदाही उत्तर मिळाले नाही. लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांनी कॉल घ्यायला हवा, अशी अपेक्षा आहे. 
- विजयकुमार देशमुख, सभापती, सोलापूर बाजार समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Call of BJP MLA to pick up Collector