तुरुंगातील 60 हजार कैद्यांची 'कोरोना' तपासणी 

तात्या लांडगे
सोमवार, 16 मार्च 2020

60 हजार कैद्यांची होणार वैद्यकीय तपासणी 
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढू लागला असून राज्यात काही ठिकाणी जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. राज्यातील तुरुंगांमध्ये सुमारे 60 हजार कैदी असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. ज्यांना ताप, सर्दी, खोकला आहे, त्यांना निगराणीखाली ठेवले जाणार आहे. तर ज्या तुरुंगांमध्ये कैद्यांची संख्या अधिक आहे, त्यांना अन्य तुरुंगांमध्ये हलविण्याचे नियोजन केले आहे. 
- अनिल देशमुख, गृहमंत्री 

सोलापूर : राज्यातील कारागृहांमधील कैद्यांची आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुरुंग प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. ऑर्थरसह अन्य काही ठरावीक तुरुंगात कैद्यांची मोठी गर्दी असल्याने त्यांना अन्य तुरुंगांमध्ये हलवावे, कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या कैद्यांना काही दिवस निगराणीखाली ठेवा, असेही आदेश दिले आहेत. 

हेही नक्‍की वाचा : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची कोंडी ! वस्तीगृहे अन्‌ ग्रंथालयांना कुलूप 

चीनमधील कोरोना आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकला असून आतापर्यंत राज्यात 32 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या सर्वच विभागाने ठोस नियोजन केले असून अधिकाऱ्यांना सक्‍त आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने आरोग्य विभाग, महसूल विभागासह अन्य विभागाचे अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दररोज कोरोनाचा नियमित आढावा घेत असून कोरोनाच्या रुग्णांची विचारपूस करीत आहेत. दरम्यान, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कारागृहातील कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 

हेही नक्‍की वाचा : अर्रार्र मोदी सरकार ! आवास योजनेतील 20 लाख कुटूंब बेघरच 

पोलिस भरतीच्या नियोजनाची गती थंडावली 
राज्यातील पोलिस दलात सुमारे 22 हजारांहून अधिक जागा रिक्‍त आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून आठ हजार जागा भरण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. रिक्‍त पदांच्या भरतीला काही दिवसांत सुरुवात करण्याचे नियोजन होते, परंतु कोरोनामुळे आता भरतीच्या नियोजनाची गती कमी करण्यात आले आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळानेही भरतीचे नियोजन पुढे ढकलेले आहे. 

हेही नक्‍की वाचा : परीक्षेपूर्वी दोघांचे ठरलं अन्‌ पेपर संपल्यावर थेट... 

ठळक बाबी... 

  • तुरुंग प्रशासनाला गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश 
  • राज्यातील विविध कारागृहांमध्ये 60 हजार कैदी 
  • संशयीत कैद्यांना निगराणीखाली ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था 
  • पोलिस भरती अन्‌ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या भरतीचे नियोजन ठप्प 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona inspection of 60000 prisoners in jail