अशी होणार पंढरीची आषाढी वारी... 'या' परंपरा होणार खंडीत

The cancellation of Ashadi Wari will affect the economy in the villages
The cancellation of Ashadi Wari will affect the economy in the villages

सोलापूर : कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक परंपरा खंडीत होत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे. यामुळे मंदिरे बंद आहेत. गावोगावाच्या यात्रा, सण, उत्सव यावर्षी झाले नाहीत. याचा परिणाम अर्थकारणावर झाला आहे. असाच फटका पंढरपूरसह संपूर्ण राज्यातील अनेक व्यवसायिकांवर झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच पंढरीची सलग दुसरी वारी रद्द होण्याचा प्रकार घडत आहे. याचा खूप मोठा परिणाम येथील अर्थकारणावर होणार आहे. 
वारीत राज्याच्या कानकोपऱ्यातून वारकरी सहाभागी होतात. लाखोंच्या संख्येने वेगवेगळ्या भागातून वारकरी दिंड्यामधून पंढरपूरला येतात. यामुळे दिंड्यांच्या वाटेवरील गावांच्या अर्थकारणात भर पडते. आळंदी आणि देहू येथून येणाऱ्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात लाखोने वारकरी येतात. यामध्ये खूप मोठ्याप्रमाणात व्यवसायिकही वेगवेगळ्याप्रकारचे साहित्य घेऊन विक्रीसाठी येतात. वारीमध्ये वैभवी लवाजमा असतो. मुक्काम दर मुक्काम करत वारी पंढरपूरला येते. यामुळे वारीच्या वाटेवर रोज एक गाव वसते आणि उठते. यामध्ये मानपानाची खूप मोठी परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खंडीत होणार आहे. कोरोनामुळे यावर्षी पालखी थेट पंढरपूरला आणली जाणार आहे. त्यामुळे पालखी सोहळा होईल मात्र, वैभवी लवाजमा नसणार आहे, असे चित्र आहे.

यंदा कोणत्याही दिंड्या निघणार नाहीत
पालकमंत्री दत्ता भरणे म्हणाले, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा कोणत्याही दिंड्या निघणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळी स्थिती नसेल तर हेलिकॉप्टर किंवा विमान आणि पावसाळी परिस्थिती असेल तर एसटीने माउलींच्या पादुका पंढरपुरात आणल्या जातील, तसे नियोजन केले आहे. यंदा कोणत्याही स्थितीत कोणतीही दिंडी निघणार नाही, हे सुरवातीलाच पवार यांनी स्पष्ट केले. आषाढी यात्रा यंदा साध्या पद्धतीनेच साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मानाचे कीर्तन, प्रवचन, मानाची पूजा अशा परंपरा होणार खंडीत

ज्येष्ठ पत्रकार व वारीचे अभ्यासक संजय पाठक म्हणाले, यावर्षी कोरोनामुळे आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय हा माणूसकीच्या हिताचा आहे. हं आता वारी हेलिकॉप्टरने, विमानाने, बसने होईल असे सांगितले जाते, पण हे सारे सवडशास्त्र झाले. माऊलींसह विविध संतांच्या पालख्यांचा वैभवी लवाजमा यंदा पाहायला, अनुभवायला मिळणार नाही याची खंत जरूर आहे. पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ते बरोबरही आहे. आषाढी वारीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे. वारीमध्ये मानाची पूजा, पालखी तळावर रोज सायंकाळी होणारे मानाचे कीर्तन व प्रवचन या परंपरा यामुळे खंडीत होणार आहेत. निर्णयामुळे वारी होणार नाही असं म्हणता येणार नाही, पण वारी ज्या "वैभवी लवाजमा'सह येते तशी यंदा येणार नाही. आषाढी वारीत लाखोंची उलाढाला होत असते. वारी निघाल्यापासून दररोज मुक्कामाच्या ठिकाणी एक गाव बसत असते आणि दुसऱ्यादिवशी ते गाव उठत असते. यातून त्या गावात लाखोंची उलाढाल होते, अन्नदानातून पुण्यप्राप्तीचे अनुकरणनीय प्रथा आहेत मात्र, यंदा हे सगळे नसेल. वारी रद्द करण्याच्या निर्णयाचा तीर्थक्षेत्र पंढरपूरसह राज्यभरातील विविध गावांच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. पंढरपूर हे वारीवर जगणारे हे गाव आहे. कोरोनामुळे यंदा सलग दुसरी वारी रद्द होत आहे. यापूर्वी चैत्र वारी रद्द झाली आहे. आषाढी वारी दरम्यान तीर्थक्षेत्र पंढरपुरात रात्रीसुद्धा दुकाने बंद होत नाहीत. मात्र, आता दिवसाही दुकान बंद आहेत. यामुळे पंढरपूरच्या स्थानिक लोकांचे, व्यापाऱ्याचे जीवनमान बदलणार आहे. पंढरपुरातील अर्थकारण हे वारीवर अवलंबून आहे. त्यामुळे तेथील छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना राज्य सरकारने आता मदत करण्याची गरज आहे. तीर्थक्षेत्र पंढरपुरात आषाढी वारी ही 12 बलुतेदारांना जगवते. पंढरपूरात कोळी समाजाचा होडीचा व्यवसाय मोठा आहे, वडर समाजाचा रथ ओढण्याचा मान आहे, काशीकापडी समाजाचा तुळशीच्या माळा बनविण्याचा व्यवसाय असतो, मुस्लीम समाजाच्या टांग्यासह, पानाच्या ठेल्यांचा वारीत मोठा व्यवसाय असतो अशा बऱ्याच जातीधर्मांना बरोबर घेऊन जाणारी ही आषाढी वारी यंदा कोरोनामुळे होणार नाही याची खंत आहे. शेकडो वर्षाची परंपरा खंडीत होत आहे याचीही खंत वाटते. पण काय करणार कालाय तस्मै नमः... 

ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वारकरी वारकी मनाने पंढरीतच असेल

वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे उपाध्यक्ष भागवत चवरे महाराज म्हणाले, सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. वारकरी हा सेवेसाठी हपापलेला आहे. मात्र तो वारकरी हट्टी नाही. कोरोनामुळे संपूर्ण जगावरच परस्थिती अशी आहे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. वारकरी अशा स्थितीत घरी राहुन मनाने दशर्न घेऊ शकेल. तो जरी घरात असला तरी त्याचे मन हे पंढरपुरात असेल. वारीत ज्या परंपरा चालत आल्या आहेत. ज्यांच्या सेवा होत्या ते आता घरी राहूनच करतील.  याआधीच्या वारीत आम्ही घरी राहून सेवा केलेल्या आहेत. ज्याच्या सेवा पालखीपुढे होत्या. ते आपल्या घरी राहून करतील.  वारकरी हा नेमही आपल्यामुळे दुसऱ्याला अडचण होणार नाही, असाच विचार करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com