आज कत्तल की रात ! मतांची जुळवाजुळव, बाहेरगावी गेलेल्या मतदारांची मनधरणी सुरू 

कुलभूषण विभूते 
Thursday, 14 January 2021

प्रचाराचा समारोप काल (बुधवारी) झाला अन्‌ गुरुवारी गावांमध्ये सन्नाटा असला तरी आता मात्र शेवटची रात्र शक्ती पणाला लावून जागली जाणार आहे. "कत्तल की रात'मध्येच आपल्या विजयाचा मार्ग मोकळा करण्यासाठी उमेदवारांनी तयारी केल्याचे दिसून येते. 

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात 95 गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या (ता. 15) मतदान होत आहे. वैराग भागात जास्त ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक पातळीवरील असल्यामुळे एकेक मत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे गाव पुढारी, पॅनेल प्रमुख, उमेदवार यांच्याकडून कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या गावातील मतदारांना गावाकडे मतदानासाठी येण्यासाठी आग्रह केला जात आहे. त्यांना थेट वाहनाने घेऊन येण्यासाठी प्रवासखर्च व आगाऊ रक्कम देण्याचे आमिषसुद्धा दाखविले जात असल्याचे दिसून येत आहे. 

बार्शी तालुक्‍यातील वैराग भागात 35 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून लॉकडाउन घोषित झाल्यामुळे नोकरी- व्यवसायानिमित्त लोक बाहेरगावी गेले. या भागातील लोक मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, कराड आदी ठिकाणी गेले ते परत गावाकडे परतले. पण गावात प्रवेश करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र आता त्यांना मतदानाला येण्यासाठी विनवण्या करण्यात येत आहेत. 

शक्तिप्रदर्शनासह दारोदारी भेट ! 
प्रचारात उमेदवारांनी दारोदारी प्रचार केलेले दिसून आले. यात घरातील ज्येष्ठ नागरिकांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेऊन "लक्ष असू द्या' अशी विनंती करण्यात आली. त्यांच्या समस्या, अडीअडचणींची आस्थेने विचारपूस केली. त्या समस्या व अडचणी सोडविण्याचे आश्‍वासनही दिले. अनेक जण कार्यकर्त्यांसह प्रभागात शक्तिप्रदर्शन करीत फेऱ्या मारताना दिसले. गावातील वातावरण प्रचाराने ढवळून निघाले होते. 

रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली ग्रामीण गावे आता गजबजलेली दिसू लागली आहेत. वैराग भागात शेळगाव (आर), तडवळे येथे तिरंगी सरळ लढती होत असून तर उर्वरित 28 गावांत दुरंगी लढती होत आहेत. धार्मिक स्थळी व ग्रामदैवतास नारळ फोडून राजकीय गटाने प्रचार सुरू केला होता. प्रचाराचा समारोप काल (बुधवारी) झाला अन्‌ गुरुवारी गावांमध्ये सन्नाटा असला तरी आता मात्र शेवटची रात्र शक्ती पणाला लावून जागली जाणार आहे. "कत्तल की रात'मध्येच आपल्या विजयाचा मार्ग मोकळा करण्यासाठी उमेदवारांनी तयारी केल्याचे दिसून येते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates and activists will try to get votes in the Gram Panchayat elections tonight