मोठी रक्कम गुंतवून "या' व्यावसायिकांची होतेय घालमेल! काय आहे समस्या? जाणून घ्या 

Caterers
Caterers

सोलापूर : शहरातील 25 ते 30 मोठ्या केटरर्स व्यावसायिकांनी या वर्षीच्या विवाह समारंभांसाठी मोठी गुंतवणूक केली होती. ऐनवेळी कामगारांची अडचण होऊ नये म्हणून कामगारांना ऍडव्हान्स रक्कम देऊन त्यांना आपल्याकडे कामासाठी तयार करवून ठेवले होते. बासमती तांदूळ, गहू, साखर आदी साहित्याची आगाऊ खरेदी करून ठेवली होती. मात्र कोरोनाने सर्व होत्याचे नव्हते केले. आता परिस्थिती अशी झाली, की प्रशासनाने जर केटरर्स व्यावसायिकांना व्यवसायासाठी परवानगी दिली तरी, त्यांना दिवाळीनंतरच कामे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांनी गुंतवून ठेवलेल्या भांडवलातून मात्र नुकसानच पदरी पडली आहे. 

यावर्षी एप्रिल, मे व जून महिन्यात विवाहांचे अनेक मुहूर्त होते. विवाहासह हळदीचे कार्यक्रम, संगीत रजनी, विवाहानंतरचे रिसेप्शन आदी कार्यक्रमांचेही केटरर्स व आचाऱ्यांकडे बुकिंग झाले होते. त्यानुसार केटरर्स व्यावसायिकांनी आवश्‍यक धान्य व इतर साहित्याची जमवाजमव करून त्यासाठी आर्थिक गुंतवणूकही केली होती. मात्र, कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव सुरू झाला अन्‌ पाहता-पाहता तो भारतातही झाला. सोशल डिस्टन्सिंग राखून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने 25 मार्चपासून लॉकडाउन घोषित केले. अनेक जिल्हे सीलबंद केले. परिणामी, नियोजित विवाह समारंभ रद्द करण्यात आले. त्यामुळे नोंदवलेले ऑर्डर्स हातातून गेल्याने केटरर्स व आचारीही हतबल झाले आहेत. 

याबाबत केटरिंग व्यावसायिक दत्ता देवकते म्हणतात, केटरिंग हा जेवणाशी संबंधित व्यवसाय आहे. जितके जास्त वऱ्हाडी तितके उत्पन्न जास्त. मात्र लॉकडाउन शिथिलीकरणानंतर 50 जणांच्या उपस्थितीतच लग्न समारंभांना प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे ऑर्डर घेता येत नाही. 50 जणांसाठी जेवण बनवणे परवडतही नाही. 19 मार्चपासून काम बंद आहे. सर्व मुहूर्त रद्द झाले. कामगारांना उचल देऊन बसलो. माझ्याकडील विवाह समारंभाचे 40 ते 45 बुकिंग रद्द झाले. नोंदवलेल्या खाद्यपदार्थांच्या हिशेबाने कमीत कमी 40 ते 45 हजार व प्लेट पद्धतीने लाख ते दीड लाखापर्यंत ऑर्डर मिळायची. बासमती तांदूळ, गहू, साखर आदी साहित्यांसाठी गुंतवणूक केली. एका केटरर्सचे जवळपास पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून निघणे आतातरी शक्‍य नाही. कारण, दिवाळीच्या पुढेच कामे मिळू शकतील. 

परवानगी मिळाली तरी सुरू नाही करणार 
बेरोजगारीमुळे वाढपी वगैरे कामगार व्यवसाय चालू करण्यास सांगतात; मात्र ते शक्‍य नाही. कारण, कामगार व वऱ्हाडी मंडळी कुठून येतील व त्यांना कोराना नाही ना, याची शाश्‍वती कोण देणार? त्यामुळे आता प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली तरी आम्ही आता व्यवसाय सुरू करणार नाही. दिवाळीनंतर तेही तेव्हाची परिस्थिती पाहून सुरू करू. कारण, गर्दीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असल्याने व गर्दी जास्त राहिली तरच आमचा व्यवसाय होईल, असेही श्री. देवकते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com