गुड न्यूज : आठ पॉझिटिव्ह रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात! कुठे? वाचा 

अभय जोशी 
गुरुवार, 9 जुलै 2020

पंढरपूरमध्ये आज सकाळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या हस्ते या आठही व्यक्तींना उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून घरी सोडण्यात आले. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर आणि तालुक्‍यातील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या आठ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटरमधून त्यांना आज (गुरुवारी) डिस्चार्ज देण्यात आला. मागील महिन्यात बऱ्या झालेल्या सात जणांना अशाच पद्धतीने वाखरी येथून डिस्चार्ज देण्यात आला होता. येथील एका बॅंकेच्या संचालकांसह आठ जणांना वाखरी येथून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी पुढील 14 दिवस त्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. 

हेही वाचा : पंढरपूरमध्ये दोन कोटी रुपये खर्चाचे होणार 50 बेडचे कोव्हिड हॉस्पिटल

आज सकाळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या हस्ते या आठही व्यक्तींना उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून घरी सोडण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले म्हणाले, वाखरी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये 250 बेडची क्षमता आहे. या ठिकाणी संशयित रुग्णांसह कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले रुग्ण तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या लोकांवर उपचार केले जातात. यापूर्वी मागील महिन्यात बरे झालेल्या सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. 

हेही वाचा : "यांना' नडला बैलगाडी शर्यतीचा शौक; दहाजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा 

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या लोकांमध्ये सातजण शहरातील आहेत तर एक व्यक्ती ग्रामीण भागातील आहे. मंगळवारी आणि बुधवारी स्वॅब घेतलेल्या 166 व्यक्तींचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. संत गजानन महाराज मठामध्ये आज काही लोकांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. पूर्वी पंढरपूर शहरात परगावाहून आलेल्या काही व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते; परंतु गेल्या काही दिवसांत पंढरपूर शहरात राहात असलेल्या लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पंढरपूरकरांनी आता खूप सतर्क राहण्याची गरज आहे. तातडीच्या कामाखेरीज कोणीही घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन डॉ. एकनाथ बोधले यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pandharpur eight corona positive patients recovered from the disease