श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्तीची विशेष काळजी घेऊ 
आज विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकियेचा 15 दिवसांत पुरातत्त्व विभाग अहवाल देणार आहे. त्यांच्या सूचनेनुसार योग्य ती दक्षता घेतली जाईल. मूर्ती संवर्धन करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने विशेष काळजी घेतली जाईल. 
- गहिनीनाथ औसेकर महाराज, सहअध्यक्ष विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती, पंढरपूर 

पंढरपूर (सोलापूर) : लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन व्हावे यासाठी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने आज मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया करण्यात आली. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही लेपन प्रक्रिया करण्यात आली. यासाठी जवळपास 14 तासांचा कालावधी लागला. लेपन प्रक्रियेमुळे उद्या (गुरुवारी) मूर्तीवर कोणतेही नित्योपचार केले जाणार नाहीत, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. 
पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाची आणि रुक्‍मिणीमातेच्या मूर्तीची झीज झाल्याचा अहवाल भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिर समितीला दिला होता. त्यानुसार मंदिर समितीने विठ्ठल आणि रुक्‍मिणीमातेच्या मूर्तीवर व्रजलेप करण्यासाठी विधी व न्याय खात्याकडे परवानगी मागितली होती. विधी व न्याय खात्याच्या परवानगीनंतर मंगळवारी (ता. 23) आणि बुधवारी (ता.24) असे दोन दिवस रासायनिक लेपनाची प्रक्रिया करण्यात आली. 
मंगळवारी (ता. 23) सकाळी प्रक्रियेच्या कामाला सुरवात झाली. त्यापूर्वी सकाळी मूर्ती संवर्धन सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक झाली. सदस्यांच्या अनुमतीनंतर दोन्ही मूर्तींची स्वच्छता कऱण्यात आली. सूक्ष्म निरीक्षण करून कशा पद्धतीने लेपन करता येईल याचा काल अभ्यास करण्यात आला. 
त्यानंतर बुधवारी (ता. 24) सकाळी नऊ ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मूर्तीवर रासायनिक लेपन करण्यात आले. येथील मंदिरातील श्री विठ्ठलाची मूर्ती ही प्राचीन असून ती वालूकामय स्वरूपाची आहे. तर रुक्‍मिणी मातेची मूर्ती ही पाषाणाची असून ती गुळगुळीत आहे. श्री विठ्ठल व रुक्‍मिणी मातेचे भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येते. त्यामुळे विठ्ठलाच्या पायाची झीज झाली आहे. विठ्ठलाच्या मूळ आणि प्राचीन मूर्तीचे संवर्धन व्हावे. त्याचबरोबर मूर्तीची झीज कमी व्हावी यासाठी रासायनिक वज्रलेप करण्यात आला. यासाठी सिलीकॉन रेझीन (वाळूपासून तयार केलेला पदार्थ) आणि पाण्यासारखा रंग हीन पदार्थाचा वापर करण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे उद्या एक दिवस देवाला स्नान किंवा अभिषेक घातला जाणार नाही. शुक्रवार (ता. 26) पासून देवाचे दैनंदिन नित्योपचार केले जातील, असेही कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemical Coating process completed on the idol of Sri Vitthal Rukmini