अजित पवार यांच्या सूचनेनुसार बोलावलेल्या बैठकीला ‘हे’ कारण सांगत प्रमुख अधिकाऱ्यांची दांडी

हुकूम मुलाणी
Saturday, 13 June 2020

तालुक्यातील रखडलेल्या वीज प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आमदार भारत भालके यांना अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली होती.

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील रखडलेल्या वीज प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आमदार भारत भालके यांना अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली होती. पण महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच या बैठकीला दांडी मारल्यामुळे आमदार भालके यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा बद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य विद्युत विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने भाळवणी येथे 132 केव्हीचे सबस्टेशन उभा केले आहे. मंगळवेढा ते भाळवणी दरम्यान वीजवाहक तारा व खांबापैकी एक खांब व 12 खांबामधील काम हे नुकसान भरपाई निश्चीतीवरून रखडले यासाठी देण्यात येणारी नुकसान भरपाई काही शेतकऱ्यांना अधिकाऱ्याने मनमानी प्रमाणे दिल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी आमदार भालके यांच्याकडे धाव घेतली. या तक्रारीनंतर यापूर्वी अनेकवेळा अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई योग्य प्रमाणात देऊन काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अधिकाऱ्याने यामध्ये योग्य प्रकारे तोडगा न काढल्यामुळे चार वर्षापासून काम रखडले. त्यामुळे तालुक्यातील दोन खाजगी साखर कारखान्यात तयार होणारी वीज कंपनीला विक्री करताना अडचण येवू लागल्यामुळे त्या कारखान्याचे आर्थिक नुकसान होऊ लागले. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भालके यांना शेतकरी व अधिकारी यांच्यात योग्य समन्वय करून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहात उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले. परंतु वाहनात बिघाडाचे कारण सांगत तब्बल दोन तास पारेषण कंपनीचे अधिकारी बैठकीस न आल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार भालकेनी याची जबाबदारी प्रांतअधिकाऱ्यावर सोपवली पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.
प्रांताधिकारी उद्यसिंह भोसले म्हणाले, वाहन बिघाड झाल्याने उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली असून त्यांना बाधीत शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई मिळाली.त्याची योग्य तपासणी करावी,वाटल्यास परत बैठक घेवू पण शेतकऱ्यांवर अन्याय करू नये अशा सूचना दिल्या. बैठकीला अधिकारी हजर असते तर योग्य तोडगा निघाला असता.
आमदार भारत भालके म्हणाले, तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे आजच्या बैठकीला अधिकाऱ्याला बोलवूनही गैरहजर राहिल्याने त्यांना गांभीर्य नसल्याने तालुक्यातील विजेचा प्रश्‍न रखडला आहे. हे मी अजितदादांच्या कानावर घालणार आहे.वीजेच्या खांब व तारामुळे बांधीत होणाय्रा क्षेत्राची योग्य भरपाई मिळावी.
शेतकरी सुधीर बिले म्हणाले, बाधीत क्षेत्राप्रमाणे नुकसान भरपाई मिळत नसल्याबाबत काम रोखले, आम्हाला पोलिस बळाचा करण्याबाबत धमकावले होते. अधिकाऱ्यांच्या मनमानी भरपाई निश्चित करत असल्याचे आम्ही आ. भारत भालके यांच्या कानावर घातले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief officer absent from the meeting convened as per Ajit Pawar instructions