अन्‌ येथे चक्क हातपंपातून वाहतेय धो-धो पाणी !

Handpump1
Handpump1

बार्शी (सोलापूर) : ग्रामस्थांचा सहभाग, लोकवर्गणी, ग्रामस्थांची श्रमदान करण्याची जबरदस्त मानसिकता तसेच नावारूपाला येण्याचे, दुष्काळ संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चुंब (ता. बार्शी) येथे ऋतूनुसार पावसाळा सुरू झाला, की खडकोणी रस्त्यावरील सुमारे पंधरा वर्षांखाली खोदलेला हातपंप चक्क धो-धो वाहताना दिसत आहे. हे बघून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे तर प्रवाशांना आश्‍चर्याचा सुखद धक्का बसत आहे. 

चुंब हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍याच्या सीमेवरील गाव. पलीकडे उस्मानाबाद जिल्हा हद्द सुरू होते. गावचे क्षेत्र 958 हेक्‍टर तर त्यातील वनक्षेत्र 4 हजार 500 हेक्‍टर आहे. वृक्षांनी लगडलेली डोंगर-दरी असे निसर्गरम्य वातावरण येथे पाहावयास मिळते. चुंब गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 2018 मध्ये सहभाग घेतला होता. 4 लाख 50 हजार रुपये लोकवर्गणी जमवली. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. पाणी फाउंडेशनकडून 10 लाख रुपये मिळाले तर राज्य शासनाकडून पाच लाखांचे बक्षीस मिळाले. गावात नाला खोलीकरण, सरळीकरण अशी कामे झाली. पाण्याचा थेंबन्‌थेंब जमा करून गाव दुष्काळमुक्त करणे हा एकच ध्यास ग्रामस्थांनी घेतला आहे. 2019 मध्ये पुन्हा स्पर्धेत भाग घेतला. सात ते आठ लाख रुपये लोकवर्गणी जमवली. 11 शेततळी झाली, नऊ माती नाला बंधारे झाले पण बक्षिसाने हुलकावणी दिली. 

ग्रामपंचायतीने खडकोणी रस्त्यावर मुंढे वस्तीसाठी 15 वर्षांपूर्वी हातपंप घेतला होता. हा हातपंप पावसाळ्यामध्ये भरून वाहात असे. पण नंतर पाणी उन्हाळ्यात कमी होत असे. सध्या हाच हातपंप भरभरून वाहात असून वरून वाहणारे पाणी नाल्यामध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. या हातपंपाजवळ शेतकरी तथा नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांची शेती असून पावसाळा सुरू होऊन पहिला पाऊस सु, झाला की हातपंपाचे पाणी वरून वाहण्यास सुरवात होते. वेळीच लक्ष दिले नाही तर पाण्याने रान चिबडते, अशी प्रतिक्रिया नायब तहसीलदार श्री. मुंढे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

चुंबचे सरपंच अशोक जाधवर म्हणाले, चुंब गावचे वनक्षेत्र लक्षात घेता पर्यटनस्थळ निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, संघटन करण्यात येत आहे. पर्यटन विकास महामंडळाकडून सहकार्य मिळाले तर ग्रामपंचायतीचे उत्पन्नही वाढेल, ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारही मिळेल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com