लेटलतिफांची उडणार झोप ; तीन लेटमार्क झाल्यास...

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

पुणे पॅटर्नची गरज 
कार्यालयीन वेळ झाली की महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे धोरण पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी अवलंबिले होते. त्यामुळे शनिवार-रविवारच्या सुटनीनंतर सोईनुसार कामावर येणाऱ्या लेटलतिफांची मोठी गोची झाली होती. जवळपास 215 ते 220 कर्मचाऱ्यांना लेटलतिफचा किताब मिळाला, त्यामुळे शिपायापासून ते खातेप्रमुखांचाही समावेश होता. सोलापूर महापालिकेतही असे प्रकार होतात. महापालिकेच्या आवारात कार्यालय असताना घराजवळील झोनमध्ये जाऊन बायोमेट्रीक करायचे आणि खासगी कामे करत फिरायचे असे खूप प्रकार आहेत. मात्र तांत्रिकदृष्टा हजेरी लागल्याने संबंधित कर्मचारी हा कार्यालयातच होता हे सिद्ध होते. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे ज्या कार्यालयात नियुक्ती आहे, त्याच ठिकाणी बायोमेट्रीक करणे सक्तीचे करणे हा त्यावर उपाय होऊ शकतो. 

सोलापूर : शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा केल्याने कार्यालयीन वेळ वाढविण्यात आली आहे. नेहमी दहा-साडेदहाच्या ठोक्‍याला कार्यालयात पोचणाऱ्या लेट लतिफांची झोप उडणार असून, तीन लेटमार्क झाल्यास एक दिवस रजा नोंदवली जाणार आहे. येत्या सोमवारपासून (ता.दोन) नव्या आदेशानुसार महापालिका कार्यालयीन वेळा निश्‍चित केल्या असून, त्यानुसार कार्यवाही होणार आहे. या संदर्भातील परिपत्रक महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. 

हेही वाचा - महापालिकेच्या अंदाजपत्रकावरील चर्चेचा दिवस ठरला 

सरकारी, निमसरकारी, महामंडळांच्या कार्यालयात उशिराने येणे, लवकर निघून जाण्याची सवय अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना असते. अशा कामचुकारांना धडा बसवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीसह अन्य पर्याय आले आहेत. पण, खासगी कंपनीत वेळेबाबतच्या नियमांप्रमाणे सरकारी, निमसरकारी, महामंडळांच्या कार्यालयात काटेकोरपणा असतोच असे नाही. त्यामुळे नियमांना वाकुल्या दाखवत अनेक कर्मचारी, अधिकारी त्याचा गैरफायदा घेतात. या साऱ्यातून संस्थेचे नुकसान होते. कामचुकार, लेटलतीफ कर्मचारी-अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी शासनाचा निर्णय कारणीभूत ठरणार आहे. 

हेही वाचा - सोलापुरातील मिळकतींच्या सर्व्हेबाबत हद्दवाढ विभाग उदासीन

सरकारी कर्मचारी वृत्ती अंगात भिनलेल्यांवर वेळीच कारवाई करायला हवी. नियम न पाळणाऱ्या, कामे न करणाऱ्या, वेळेत ड्युटीवर हजर न होणाऱ्या, लवकर कार्यालये सोडणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. कामगार संघटनांकडूनही त्यासाठी दबाव येऊ शकतो, हे लक्षात घेत आधुनिक तंत्राचा वापर करून वेळांबाबत आग्रही धोरणे राबवण्याची गरज असणार आहे. 

सोलापूर महापालिकेची सध्याची कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच अशी आहे. त्याऐवजी आता ही वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा अशी होणार आहे. याशिवाय दुपारी एक ते दोन दरम्यान जास्तीजास्त 30 मिनिटे भोजनासाठी सुटी असणार आहे. नव्या आदेशानुसार संगणक विभागाने महापालिकेतील बायोमेट्रीक यंत्रणेत वेळेचा बदल केला आहे. त्यामुळे पावणेदहानंतर बायोमेट्रीक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना "लेटलतिफ'चा शिक्का बसणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Circular of General Administration Department for five days a week solapur corporation