हवामान बदलाचा "या' पिकावर होतोय परिणाम

मोहन काळे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

हरभरा पिकासाठी थंडी महत्त्वाचे असते आणि यावर्षी रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यामध्ये थंडी अशी पडलीच नाही. उलट सतत ढगाळ वातावरण तयार होत गेले. त्याचा विपरीत परिणाम हरभरा पिकावर झाला आहे. ढगाळ वातावरण घाटे अळीसाठी पोषक असल्यामुळे हरभऱ्यावर यंदा दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घाटे अळी दिसून येत आहे.

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : हवामान बदलाचा मोठा फटका यंदा हरभरा पिकाला बसला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर यंदा घाटे अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यंदाचा रब्बी हंगाम सुरू झाल्यापासून सतत ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घाटे अळीच्या नियंत्रणावरील खर्चात वाढ झाली आहे.

हेही वाचा - मेंढीची किंमत ऐकून तुम्हीही व्हाच चकित
 

शेतकऱ्यांचा होऊ लागला हजारो रुपये खर्च

कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू व हरभरा या पिकांची शेतकरी लागवड करीत असतात. कमी कालावधीत व कमी पाणी आणि कमी खर्चात येणाऱ्या हरभरा पिकाची लागवड शेतकरी प्रामुख्याने करीत असतो. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. या ऊस पट्ट्यात सुद्धा शेतकरी आंतरपीक म्हणून हरभऱ्याची लागवड करतात. यामध्ये बहुतांश शेतकरी हरभऱ्याच्या सुधारित जातीचा वापर करत असतो. तर कोरडवाहू भागातील शेतकरी हा हरभऱ्याच्या लागवडीसाठी देशी वाणाची निवड करतो. हरभरा पिकासाठी थंडी महत्त्वाचे असते आणि यावर्षी रब्बी हंगामाच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यामध्ये थंडी अशी पडलीच नाही. उलट सतत ढगाळ वातावरण तयार होत गेले. त्याचा विपरीत परिणाम हरभरा पिकावर झाला आहे. ढगाळ वातावरण घाटे अळीसाठी पोषक असल्यामुळे हरभऱ्यावर यंदा दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घाटे अळी दिसून येत आहे. सध्या हरभरा फुलोरा अवस्थेत आहे तर काही भागात घाट्यामध्ये दाणे भरू लागले आहेत. या दोन्ही अवस्थेतील हरभरा पिकावर सध्या घाटे अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. घाटे अळीमुळे हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे शेतकरी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करू लागले आहेत. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी अजूनही रासायनिक औषधांचा वापर जास्त करत आहेत. त्यामुळे घाटे अळीच्या नियंत्रणावरील शेतकऱ्यांचा हजारो रुपये खर्च होऊ लागला आहे. घाटे अळी नियंत्रणात येत नसल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत.

हेही वाचा - पुतण्याकडे "ओबीसी' तर खासदारांकडे "एससी'चे प्रमाणपत्र

हरभऱ्याला यंदा चांगले वातावरण नाही. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याला फुले व घाटेही भरपूर लागले नाहीत. अशा परिस्थितीत घाटे अळी नियंत्रणात येत नसल्याने हरभऱ्याचे जास्त नुकसान झाले आहे.
- पवन चव्हाण,
हरभरा उत्पादक शेतकरी,
बाभूळगाव, ता. पंढरपूर

शेतकऱ्यांनी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी केवळ रासायनिक औषधांची फवारणी न करता घाटे अळीचे एकात्मिक नियंत्रण करावे.
- अजय अधाटे,
संचालक, कृषी विकास फाउंडेशन, मंगळवेढा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Climate change is affecting the crop