बापरे! दीडवर्षाचा 'राजा' साडेआठ लाखाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

हौसेने काढली मिरवणूक 
कलप्पा पुजारी व त्यांच्या मित्रांनी बुधवारी हन्नूर गावी आपली मेंढी साडेआठ लाखास विकल्याने आनंदी होऊन सवाद्य नाचत, गात व फेटे बांधून मिरवणूक काढली. त्यानंतर देवदर्शन करून राजा मेंढी खरेदीदाराच्या ताब्यात दिली. यामुळे तालुक्‍यात ही राजा मेंढी चर्चेचा विषय झाली आहे.

अक्कलकोट (जि. सोलापूर) : हन्नूर (ता. अक्कलकोट) येथील कलप्पा येगप्पा पुजारी यांनी एका मेंढीच्या विक्रीतून तब्बल साडेआठ लाख रुपये उत्पन्न मिळविले. त्यातून एक उच्चांक प्रस्थापित केला व त्याचबरोबर जिद्दीच्या आणि कष्टाच्या बळावर मेंढपाळाचा व्यवसाय स्थिरस्थावर करता येतो आणि त्यातून भरघोस नफा मिळवता येतो, हा एक वेगळा संदेश सर्वांसमोर ठेवला आहे. 

हेही वाचा - सहा आमदार असूनही माध्यमिकचे शिक्षक बेदखल 

हन्नूर येथील कलप्पा पुजारी हे सध्या केवळ पंधरा मेंढी सांभाळून आहेत. अडचणीमुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी 15 मेंढ्या विकल्या देखील आहेत. त्यातील दीड वर्षापूर्वी जन्मलेली "राजा' नावाची मेंढी त्यांना साडेआठ लाख रुपये मिळवून दिली आहे. कारण, ही मेंढी दीड वर्षापूर्वी जन्मतःच दिसणारे त्याचे पोपटासारखे नाक आणि वेगळी शरीरयष्टी पाहून त्याला चांगले सांभाळले व यातून उत्पन्न मिळविण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यातून कष्ट उपसण्याची तयारी दाखवली. ते राजा मेंढीला सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी चार लिटर दूध एका टोपल्यात घालून ठेवणे आणि ते पाणी पिल्यासारखे मेंढीने पिणे हा नित्यक्रम होता. त्याचप्रमाणे सकाळी एक किलो भिजवलेला हरभरा आणि संध्याकाळी एक किलो शेंगदाणे असा दररोज खुराक त्या मेंढीस होता. दुधासाठी गरज म्हणून 50 आणि 70 हजार असे एकूण एक लाख 20 हजार खर्च करून दोन म्हशी देखील त्यांनी विकत घेतल्या. अशी सगळी पोटच्या मुलाप्रमाणे ते या मेंढीची काळजी घेत. 

हेही वाचा - (video)... पहा कशी जळाली सोलापुरात बस ! 

विजयपूर येथील मेंढपाळाचा व्यवसाय करणारे सोमनाथ यांनी या मेंढीची पाहणी केली. त्यांना ही मेंढी खूपच आवडली. मेंढीची ही प्रजात वाढविण्यासाठी त्यांनी साडेआठ लाख रुपये देऊन या राजा मेंढीची खरेदी केली. एकंदरीतच या राजा मेंढीसाठी गेल्या दीड वर्षात चार लाख रुपये खर्च आला होता. त्यातून पुजारी यांना साडेआठ लाख रुपये उत्पन्न मिळाले. पुजारी यांनी यावरून बेरोजगार तरुणांना मेंढी व्यवसाय देखील आर्थिक सबलता देऊ शकतो, हे सिद्ध देखील करून दाखवले. पुजारी यांच्या राजा मेंढीमुळे मेंढी व्यवसाय करणाऱ्या आणि तालुक्‍यातील तरुण वर्गाला याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे, हे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Akkalkot taluka the sheep got rs 8 lakh 50 thousand