भाजप आमदार म्हणतायेत विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद; मंदिर मात्र सुरुच 

अभय जोशी 
मंगळवार, 17 मार्च 2020

आमदार राम कदम यांनी घोषणा केली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत निर्णय देण्यात आलेला नाही. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर बंद करण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे सदस्य व भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबईत केली आहे. उद्या या संदर्भात मंदिर समितीची पंढरपूर येथे बैठक होणार होती, तत्पूर्वी श्री. कदम यांनी मुंबईतून याची घोषणा केली आहे. 
कोरोनाची साथ वाढू लागल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून काही दिवसापुरते विठुरायाचे पूर्ण दर्शन बंद करावे किंवा किमान पदस्पर्श दर्शन बंद करून केवळ मुखदर्शन सुरू ठेवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली होती. 
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथ घोषित केली आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी जगभरात विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. 
कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही दिवस राज्यातील शासकीय कार्यक्रम, यात्रा, उत्सव बंद करावेत असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 
त्याची दखल घेऊन तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी , परळी वैजनाथ येथील श्री वैजनाथ, मुंबईतील सिद्धिविनायक, शेगाव मधील श्री संत गजानन महाराज, श्रीक्षेत्र ज्योतिबा येथील दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच शिर्डी येथील संस्थांना देखील दुपारपासून दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 
दरम्यान श्रीविठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीची उद्या 18 मार्चला या संदर्भात पंढरपूर येथे बैठक होणार होती. या बैठकी आधीच आज समितीचे सदस्य आमदार राम कदम यांनी दक्षता म्हणून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर बंद करण्यात येत असल्याची घोषणा मुंबई येथे केली आहे. यासंदर्भात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांना विचारले असता "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, विश्वस्त आमदार राम कदम यांनी घोषणा केली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत निर्णय देण्यात आलेला नाही. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closed for Vitthal tempal in Pandharpur