अवैध धंद्यांत भागिदारी ! पोलिस आयुक्‍तांनी 'या' चार पोलिसांना केले बडतर्फ

तात्या लांडगे
Wednesday, 2 September 2020

'त्या' तिघांनाही यापूर्वी केले बडतर्फ
भाजपचे नगरसेवक सुनिल कामाठी याच्या मटका बुकी व्यवसायात भागिदारी करुन अवैध व्यवसायास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी स्टीफन स्वामी याला पोलिस आयुक्‍तांनी काही दिवसांपूर्वी बडतर्फ केले आहे. त्यापूर्वी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा ठपका ठेवत जयप्रकाश कांबळे व किर्तीराज अडगळे या दोघांनाही पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी बडतर्फ केले आहे. पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर पोलिस आयुक्‍तांनी धडक कारवाई केली आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्‍तांनी दिला आहे.

सोलापूर : अवैध धंद्यात भागिदारी असल्याच्या कारणावरुन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दहा दिवसांत सोलापूर शहरातील चार पोलिस कर्मचारी बडतर्फ केले आहेत. सातत्याने चर्चेत असलेल्या विजापूर नाका पोलिस ठाण्याचे तीन कर्मचारी आहेत. तर जेलरोड पोलिस ठाण्याच्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

विजयपूर रोडवरून शहरात अवैधरित्या रात्री-अपरात्री वाळू वाहूक करणारी वाहने येतात. या पार्श्‍वभूमीवर अनेकदा अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अवैध वाळू वाहतुकीत भागिदारी करीत त्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्याचा कर्मचारी विकी गायकवाड याला पोलिस आयुक्‍त शिंदे यांनी बुधवारी (ता. 2) बडतर्फ केले. गायकवाड याचा गुन्हेगारी कृत्यामधील सक्रीय सहभागाबद्दल व 2014 मध्ये विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत असताना जड वाहतुकीस बंदी असताना शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याजवळ साध्या वेशात जाऊन त्याने लाईनमधील वाळूचा ट्रक सोडून दिला होता. त्यावेळी अरेरावीची भाषा वापरून, शिवीगाळ करुन कर्तव्यावरील कर्मचाऱ्याची गच्ची पकडून पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करण्याचे वर्तन केले. 2012-13 मध्ये तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षकांनाही माझी वाळूची गाडी का पडकली म्हणून विकी गायकवाड याने एकेरी व अरेरावीची भाषा वापरली होती. अशा कर्मचाऱ्यास शासकीय सेवेत ठेवणे ही बाब लोकहितास बाधा पोहचविणारी असल्याने त्याला निलंबीत केले जात आहे, असेही आयुक्‍तांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

'त्या' तिघांनाही यापूर्वी केले बडतर्फ
भाजपचे नगरसेवक सुनिल कामाठी याच्या मटका बुकी व्यवसायात भागिदारी करुन अवैध व्यवसायास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी स्टीफन स्वामी याला पोलिस आयुक्‍तांनी काही दिवसांपूर्वी बडतर्फ केले आहे. त्यापूर्वी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा ठपका ठेवत जयप्रकाश कांबळे व किर्तीराज अडगळे या दोघांनाही पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी बडतर्फ केले आहे. पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर पोलिस आयुक्‍तांनी धडक कारवाई केली आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्‍तांनी दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner of Police Ankush Shinde dismissed four police personnel from Solapur