बापरे! कृषी सेवा केंद्रात मुदत संपलेली खते; ग्राहक पंचायतीची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

करमाळा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांना नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देत नसल्याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांना नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देत नसल्याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यातील कृषी सेवा केंद्राविषयी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत मध्य महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे प्रांत सचिव भालचंद्र पाठक यांनी ही तक्रार केली आहे. यापूर्वी वारंवार मागणी करून देखील शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नसल्याने ग्राहक पंचायतीच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मालाच्या साठ्याचा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक असतानाही कोणत्याही ठिकाणी असे दिसून येत नाही. याशिवाय अधिकृत परवाना प्राप्त असल्याचा फलक, जीएसटी नोंद फलक, खते बियाणे गोण्यांचे वजन मोजण्यासाठी वजन काटा अनेक ठिकाणी आढळून येत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. खते उपलब्ध असताना देखील एखाद्या खताची विक्री करण्यासाठी त्याबरोबर दुसरे खत घेण्याचा आग्रह दुकानदारांकडून धरला जातो. त्यामुळे शासनाच्या नियमाचे पालन न करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. याशिवाय ओट्यावर रस्त्यावर खते, बियाणे विक्री करणाऱयांवर कारवाई करावी, मुदत संपलेली औषधे, खते, बियाणे कृषी सेवा केंद्रात आढळून येत असून त्याची विक्री होत आहे ही बाब गंभीर आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे, याशिवाय कृषी सेवा केंद्रात विक्री रजिस्टर, खते, बियाणे, औषधे दुकानदाराने खरेदी केली तिची नोंद रजिस्टर तसेच अधिकारी भेट दिले त्याचे नोंद रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय कोणतेही खत बियाणे व इतर साहित्य घेतल्यास त्याची पावती द्यावी, अशा मागण्या ग्राहक पंचायतीकडुन करण्यात आल्या आहेत.
करमाळा तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील म्हणाले, कृषी सेवा केंद्राच्या तपासणी केली जात आहे. जे कृषी सेवा केंद्र दोषी आढळले त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.ज्या दुकानदारांना सुचना दिल्या आहेत. त्यांनी सुधारणा न केल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint of Consumer Panchayat to Agriculture Officer in Karmala taluka