सांगोल्यात विवाहितेचा छळ; नवरा, सासू, सासरा व दिरांविरुद्ध तक्रार

दत्तात्रय खंडागळे 
Sunday, 30 August 2020

लग्नात नऊ तोळे सोन्याचे दागिने व इतर प्रापंचिक साहित्य देण्यात आले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी, तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नामध्ये आमचा काही योग्य तो मान पण केला नाही, आम्हास जमीन घ्यायची आहे तेव्हा तू वडिलांकडून चार लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेस सासरच्या व्यक्तींकडून त्रास दिला जात होता. या वेळी विवाहितेच्या वडिलांनी चार लाख रुपये दिले. त्यानंतरही विवाहितेच्या वडिलांनी आणखी दोन लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपये दिले. 

सांगोला (सोलापूर) : लग्नात तुझ्या माहेरच्यांनी आमचा काही योग्य तो मानपान केला नाही, यासह जमीन खरेदी करण्यासाठी वेळोवेळी माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी घालून पाडून बोलणे, शिवीगाळ करणे व मारहाण करून माहेरी घालवून पुन्हा नांदण्यास नेले नाही म्हणून खिलारवाडी (ता. सांगोला) येथील विवाहितेने नवरा, सासू, सासरा व दिरांवर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

हेही वाचा : कोरोना नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला नाही : पालकमंत्री भरणे 

फिर्यादी विवाहितेचे 7 जुलै 2016 रोजी खिलारवाडी (ता. सांगोला) येथील उदय भीमराव खिलारे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नात नऊ तोळे सोन्याचे दागिने व इतर प्रापंचिक साहित्यही देण्यात आले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी, तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नामध्ये आमचा काही योग्य तो मान पण केला नाही, आम्हास जमीन घ्यायची आहे तेव्हा तू वडिलांकडून चार लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेस सासरच्या व्यक्तींकडून त्रास दिला जात होता. या वेळी विवाहितेच्या वडिलांनी चार लाख रुपये दिले. त्यानंतरही विवाहितेच्या वडिलांनी आणखी दोन लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपये दिले. परंतु विवाहितेस वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मारहाण व त्रास दिला जात होता. 

डिसेंबर 2019 मध्ये मारहाण करून नवऱ्याने विवाहितेस माहेरी आई-वडिलांकडे हाकलून दिले. तेव्हापासून विवाहितेस नांदण्यासाठी नेण्यात आले नाही. 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी एक वाजता वडिलांसोबत पीडित विवाहित महिला सासरच्या घरी गेली असता विवाहितेचा नवरा उदय भीमराव खिलारे, सासू मालन भीमराव खिलारे, सासरे भीमराव गजेंद्र खिलारे, दीर जनक भीमराव खिलारे व योगीराज भीमराव खिलारे (सर्व रा. खिलारवाडी, ता. सांगोला) यांनी पुन्हा नांदण्यास घेतले नाही. मारहाण, माहेरून पुन्हा नांदणेस नेले नाही, नवऱ्याने दुसरे लग्न केले असल्याची माहिती तसेच शिवीगाळ, दमदाटी केल्याची फिर्याद विवाहितेने नवरा, सासू, सासरा व दिरांविरुद्ध तक्रार केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint lodged against husband, mother-in-law, father-in-law and brother-in-law for harassing a married woman in Sangola