कोरोना नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : पालकमंत्री भरणे

हुकूम मुलाणी 
Saturday, 29 August 2020

पालकमंत्री भरणे म्हणाले, की कोविड नियंत्रणासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असून, त्या प्रयत्नाला यश येत आहे. जनतेने सोशल डिस्टन्सचे पालन करत बाहेर वावरावे. आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी. कोविडच्या नियंत्रणासाठी मंगळवेढ्यातील प्रशासनाने चांगले काम केले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 

मंगळवेढा (सोलापूर) : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना रोगाचा अटकाव करण्यासाठी मंगळवेढ्याच्या प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून, भविष्यातही कोविड नियंत्रणासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. 

हेही वाचा : आंदोलनकर्त्या गोडसे यांनी केले शिरनांदगी तलावातील पाण्याचे पूजन 

कोरोनाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री श्री. भरणे मंगळवेढ्यास आले असता बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार भारत भालके, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते. या वेळी बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले, की कोविड नियंत्रणासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असून, त्या प्रयत्नाला यश येत आहे. जनतेने सोशल डिस्टन्सचे पालन करत बाहेर वावरावे. आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी. कोविडच्या नियंत्रणासाठी मंगळवेढ्यातील प्रशासनाने चांगले काम केले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जनतेने देखील काळजी घ्यावी. परंतु त्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्‍यक ती काळजी घेतली जाईल. तालुक्‍यातील आरोग्य खात्यात असलेल्या रिक्त पदांबाबतही पदे भरण्याचा दृष्टीने प्रक्रिया सुरू असून, लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल. त्या दृष्टीने लक्ष घातले जाईल. 

हेही वाचा : अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रश्न सोडवणार : नानासाहेब पटोले 

आमदार भारत भालके यांनी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा बंद असल्याने या भागातील जनतेला पाण्यासाठी त्रास होत आहे, तरी ही योजना सुरू करण्याची मागणी या वेळी पालकमंत्री भरणे यांच्याकडे केली. तेव्हा पालकमंत्री भरणे यांनी, या योजनेमध्ये हस्तांतरणाचा मुद्दा तत्काळ निकाली काढून योजना तत्काळ सुरू करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत नवीन कोविड सेंटर तयार करणे, गाव पातळीवर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे तत्काळ विलगीकरण करणे. इतर विषयावर चर्चा करून त्या तत्काळ मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री पहिल्यांदाच भेट दिल्याबद्दल महसूल प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Guardian Minister assured that the funds for the control of Corona would not be reduced