पंढरपुरातील संचारबंदीबाबत संभ्रम; पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

अद्याप आदेश नाही 
दरम्यान, शनिवारी रात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांना पंढरपुरातील प्रस्तावित संचारबंदीविषयी विचारले असता त्यांनी जिल्हाधिकारी यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे. मागील दोन दिवसांपासून पंढरपुरात 29 जून ते 2 जुलै असे चार दिवस संचारबंदी लागू केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला असला तरी अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी कोणताही आदेश काढलेला नाही. त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी वारी 2020 च्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने पंढरपूर शहरात संचारबंदी प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावाला पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांच्यासह सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी सचिन ढोले यांना भेटून लेखी निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी कोणताही आदेश काढलेला नाही, त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था आहे. 
आषाढी यात्रा कालावधीतील 29 जून ते 2 जुलै असे चार दिवस पंढरपूर शहर आणि 10 किलोमीटर परिसरातील गावात संचारबंदी लागू करावी, अशा आशयाचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांच्यासह नगरपालिकेतील सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांनी संचारबंदी लागू करण्यास विरोध दर्शवला आहे. 
याविषयी प्रांताधिकारी श्री. ढोले यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद की, सर्वसामान्य नागरिक, महाराज मंडळी व व्यापाऱ्यांची संचारबंदीविषयी नाराजी आहे. भाविकांना रोखण्यासाठी शहरापासून 10 किलोमीटरपर्यंत नाकाबंदी केलेली आहे. त्यामुळे शहरात भाविक येण्यास कोणताही वाव नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होणार नाही. मागील तीन महिन्यांपासून कोरोना पार्श्‍वभूमीवर पंढरपुरातील व्यापार ठप्प असल्याने आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता आषाढी वारी रद्द झाल्याने नुकसानीत आणखी भर पडणार आहे. शहरातील व्यापारी, नागरिक आणि सर्वांनीच आतापर्यंत प्रशासनास सहकार्य केलेले आहे. यापुढेही सहकार्य असेल, परंतु संचारबंदी निर्णयाचा फेरविचार करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion over curfew in Pandharpur city