सोलापुरातील कॉंग्रेस, शिवसेनेचा रुसवा निघणार?, पालकमंत्री भरणे शुक्रवारी घेणार बैठक 

प्रमोद बोडके
Wednesday, 14 October 2020

पालकमंत्री घेणार इतरही बैठका 
शुक्रवारी (ता. 16) दुपारी 12 वाजता पालकमंत्री भरणे यांचे सोलापुरातील शासकिय विश्रामगृहात आगमन होणार आहे. प्राथमिक शिक्षक संघटना, माध्यमिक शाळा कृती समिती यांच्यासोबत ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या कोरोना ड्युटीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. "घर पोहोच आहार, ताजा गरम आहार', शालेय पोषण आहार या योजनांबाबत पालकमंत्री बैठक घेणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री भरणे शासकिय विश्रामगृहात येणार असून या ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षाच्या जिल्हा प्रमुखांसोबत ते बैठक घेणार आहेत. त्यानंतर 5 वाजता ते इंदापूरला जाणार आहेत. 

सोलापूर : राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे जिल्हा पातळीवर व गाव पातळीवर आजही संबंध ताणलेलेच आहेत. राज्याच्या सत्तेतील पक्ष स्थानिक पातळीवर मात्र वारंवार एकामेकांच्या समोर येताना दिसत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री पद दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. पालकमंत्री भरणे आम्हाला विश्‍वासात घेत नाहीत म्हणून कधी शिवसेनेने तर कधी कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री भरणे शुक्रवारी (ता. 16) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी पहिल्यांदाच अधिकृतपणे महाविकास आघाडी सरकारमधील जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत ते कॉंग्रेस आणि शिवसेनेची नाराजी दुर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोरोनाच्या संकटात सोलापूरचे पालकमंत्रीपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आले. तत्कालिन पालकमंत्री जितेंद्र आव्हाडच कोरोनाबाधित झाल्याने सोलापूरच्या पालकमंत्री पदाची धुरा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोपविण्यात आली. सोलापूरचे पालकमंत्री पद भरणे यांना मिळाले आणि सोलापुरात कोरोनाचे संकट तीव्र झाले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या राजकारणाला हात घालायला सुरुवात केली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत असून दुपारी साडेतीन वाजता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या रुसवा निघणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress in Solapur, Shiv Sena's nervous will leave ?, Guardian Minister will hold a meeting on Friday