"झेडपी'च्या सभेत महिलांची टिंगल! "असले इथे चालणार नाही'; कोणी दिला इशारा? वाचा सविस्तर 

संतोष सिरसट 
Tuesday, 11 August 2020

माळशिरस तालुक्‍यातील सदस्या ज्योती पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबद्दलचा प्रश्‍न उपस्थित केला. मतदारसंघातील एका महिलेवर डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया केली. मात्र, ती फेल गेल्याने त्या महिलेच्या अपत्यांची संख्या वाढली. एकवेळ नाही तर दोनवेळा त्या महिलेची शस्त्रक्रिया फेल गेल्याचे पाटील यांनी सभागृहात सांगितले. संबंधित डॉक्‍टरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्याला जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तर देत असतानाच एका पुरुष सदस्याने त्याबाबत टिंगल केली. 

सोलापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नियोजन भवन येथे झाली. या सभेमध्ये महिला सदस्यांची टिंगल-टवाळी पुरुष सदस्यांनी केली. त्यावर "असले इथे चालणार नसल्याचा' इशारा अकलूजच्या सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी सभागृहात दिला. त्यावर सभागृह काहीवेळ स्तब्ध झाले. 

हेही वाचा : बापरे! कोरोनामुक्त झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाचा धोका ! 

माळशिरस तालुक्‍यातील सदस्या ज्योती पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबद्दलचा प्रश्‍न उपस्थित केला. मतदारसंघातील एका महिलेवर डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया केली. मात्र, ती फेल गेल्याने त्या महिलेच्या अपत्यांची संख्या वाढली. एकवेळ नाही तर दोनवेळा त्या महिलेची शस्त्रक्रिया फेल गेल्याचे पाटील यांनी सभागृहात सांगितले. संबंधित डॉक्‍टरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्याला जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तर देत असतानाच एका पुरुष सदस्याने त्याबाबत टिंगल केली. सर्व सभागृहात अशाप्रकारे महिलांची टिंगल-टवाळी करणे, योग्य नसल्याचे मोहिते-पाटील यांच्या लक्षात आले. त्याच वेळी त्यांनी उभे राहून सभागृहाचे लक्ष वेधले. अशाप्रकारे महिलांची टिंगल-टवाळी करण्याचे प्रकार इथे चालणार नसल्याचे त्यांनी सभागृहात ठणकावून सांगितले. त्या वेळी काहीवेळ सभागृह स्तब्ध झाले होते. अशाप्रकारे महिलांची अवहेलना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाल्याने महिला सदस्या आक्रमक झाल्या. 

हेही वाचा : धक्कादायक ! मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून "या' गावात मुलाच्या वडिलास झाडाला बांधून मारहाण 

सदस्य उमेश पाटील यांनी शिरापूर (ता. मोहोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांचा विषय सभागृहात मांडला. मोठा पैसा खर्च करून त्या ठिकाणी आरोग्य केंद्र सुरू केले. पण, त्या ठिकाणची "ओपीडी' अतिशय कमी आहे. त्या ठिकाणी असलेले डॉक्‍टर चांगले नसल्याच्या तक्रारी लोकांनी माझ्याकडे केल्या आहेत. पण, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले. "एनआरएचएम'च्या पाच कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेऊ नये, असे आदेश आरोग्यमंत्र्यांचे असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी पुन्हा त्यांची फाइल पुटअप करतात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा माझ्यावर दबाव असल्याचे सांगतात, ही गोष्ट चुकीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यावर अध्यक्षांनी आपल्याला ते गावच माहिती नसल्याचे सांगितले. 

त्यांचे दोन टक्‍क्‍यांत भागत नाही! 
ग्रामीण भागात झालेल्या कामाची बिले काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची शिफारस घेण्याचे यापूर्वी सांगितले आहे. पण, गटविकास अधिकाऱ्यांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला आहे. त्यांची शिफारस करण्यासाठी त्यांना टक्केवारी द्यावी लागत आहे. दोन टक्‍क्‍यांवरही त्यांचे भागत नाही. त्यामुळे त्यांना दिलेले अधिकार रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते बळिराम साठे यांनी केली. त्याला इतर सदस्यांनीही अनुमोदन दिल्याने तसा ठराव घेण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contempt of women in Solapur Zilla Parishad meeting