सोलापूरच्या "महाविकास'चा मिटला वाद, पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून सुरु झाला संवाद 

प्रमोद बोडके
Friday, 30 October 2020

आंदोलनासाठी येणार एकत्र 
सोलापूर महापालिका, सोलापूर जिल्हा परिषद आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. केंद्र सरकार, झेडपी व महापालिकेच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय झाला तर त्यासाठी पालकमंत्री भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करतील असा विश्‍वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी यावेळी व्यक्त केला. 

सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे फक्त राष्ट्रवादीचेच पालकमंत्री आहेत. पालकमंत्री आम्हाला विश्‍वासात घेत नाहीत. यासह अनेक तक्रारी महाविकास आघाडीतील शिवसेना व कॉंग्रेसच्या नेत्यांनी केल्या. या तक्रारींचा सूर कधी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला तर कधी प्रसार माध्यमांपर्यंत. राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेते एकत्रित आहेत. आपणही जिल्हास्तरावर एकत्रित काम करु असा निर्धार सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज व्यक्त केला. वाद मिटवत संवाद घडविण्यात पालकमंत्री भरणे यांना मिळाले आहे. 

शासकीय विश्रामगृहात आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख मित्रपक्षांच्या शहर व जिल्हाध्यक्षांच्या झालेल्या बैठक झाली. या बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री भरणे म्हणाले, आमच्यात कसलेही मतभेद नव्हते. कोरोना आपत्तीमुळे संसर्ग रोखण्यासाठी दूर राहण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न होता. यापुढील काळात राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते एकत्र काम करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The controversy over Solapur's "Mahavikas" ended with the efforts of the Guardian Minister