कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौशल्याधारीत प्रशिक्षणावर हवा भर

Corona background emphasizes skill based training
Corona background emphasizes skill based training

सोलापूर : लॉकडाउनमुळे जगात अनेक उलथापालथ घडून येण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रातील घडामोडी मोठ्या प्रमाणात बदलताना दिसणार असून, 'कोरोना'शी यशस्वी ठक्कर देऊन जो टिकेल तोच पुढे बलाढ्य ठरणार आहे. तसेच बदलत्या तंत्रज्ञानानुसार अद्ययावत तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करेल त्या देशातील बेरोजगारीचा प्रश्न मिटणार असून, त्या दृष्टीने भारतालाही खूप मोठी संधी प्राप्त होणार आहे.
'कोरोना' महामारीने संकटाबरोबरच मोठी संधीही भारतासाठी निर्माण केली आहे. कोरोनाचा उगम चीनमधून झाल्याचा आरोप अनेक देश करीत आहेत. भविष्यात चीनच्या उत्पादनांवर अनेक राष्ट्रे बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास व्हिएतनाम, दक्षिण कोरिया व व भारत प्रॉडक्शन हब होऊ शकतात. त्यासाठी भारतातील जुने, कालबाह्य तंत्र बाजूला सारून अद्ययावत तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करावी लागतील. 
सोलापुरातील अनेक उत्पादनांना चीनच्या उत्पादनाशी स्पर्धा करावी लागते. त्यात टेरी टॉवेल, गारमेंट ही उत्पादने महत्त्वाची आहेत. मात्र आज टेक्सटाईल उत्पादनांचे प्रशिक्षण देणारी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र येथे उपलब्ध नाहीत. जी आहेत ती जुन्या व कालबाह्य यंत्रणा आहे. बिट्रासारख्या संस्थेत जुनी यंत्रसामुग्री आहे, त्यामुळे आधुनिक रॅपिअर व एअरजेट यंत्रमागांचे व बॅक प्रोसेसचे प्रशिक्षण येथे मिळत नाही. त्याचप्रमाणे गारमेंट उद्योगातील उत्पादने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचून सोलापूर गारमेंट हब होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यापुढे प्रत्येकाला मास्कशिवाय घराबाहेर पडणे धोकादायक ठरणार असल्यामुळे, जसा हातरुमाल सोबत ठेवावा लागतो, तसा तोंडाला मास्कची सवय लावावी लागणार आहे. त्यामुळे मास्कची निरंतर उत्पादने गरजेची आहेत. तसेच पीपीई किट, फेस शिल्ड हे नवीन उत्पादनही सध्या सुरू आहे. मात्र कुशल कारागिरांची कमतरता या उद्योगाला सतावत आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत कौशल्य विकासाच्या योजना राबविणे गरजेचे आहे. तसेच आयटीआयमधील पारंपरिकऐवजी व्यावसायिक प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक बनले आहे. आज आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीला मशिन ऑपरेट करायला येत नाही. आयटीआयने आता जुजबी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्रांचे भेंडोळे देण्यापेक्षा कुशल कारागिरांची निर्मिती करावी, जी सध्या वस्त्रोद्योगाला व इतर क्षेत्राला अत्यावश्यक आहे व बेरोजगारालाही.
आज अनेक उद्योगांमध्ये अत्याधुनिक मशिनरी आल्या आहेत, तरी अनेक कौशल्य विकास व प्रशिक्षण संस्था जुन्या पद्धतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे प्रशिक्षण संस्थेमधून बाहेर पडलेले विद्यार्थी मोठ्या कंपन्यांमध्ये एक दिवसही टिकत नाहीत. परिणामी त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन, बेरोजगारीही पदरी पडते. 

कौशल्य विकासाकडे लक्ष द्यायाला हवे
कोरोनामुळे अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र या प्रत्यक्ष क्षेत्रात ज्याच्याकडे कौशल्य आहे तोच रोजगार मिळवू शकतो. त्यासाठी जुन्या पारंपरिक पद्धतींना तिलांजली देऊन शासनाने अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण उपलब्ध केल्यास, भारत जगाला विविध वस्तूंचा पुरवठादार बनेल.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीननंतर संपूर्ण देश भारताकडे त्या दृष्टीने पाहात आहे. तेव्हा शासनाने कौशल्य विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे.
- विजय उडता, समुपदेशक, कौशल्य विकास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com