कोरोनामुक्त आमदार गोपीचंद पडळकर यांचे फुलांची उधळण करत स्वागत 

भारत नागणे 
Saturday, 12 September 2020

पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर ते पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. योग्य उपचारानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. 

पंढरपूर (सोलापूर) : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आज योग्य उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. त्यांना आज येथील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने विविध फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले. 

पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर ते पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. योग्य उपचारानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. 

आमदार पडळकर आज कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी गुलाब फुलांचा वर्षाव करत त्यांचे अभिनंदन केले. तर बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, धनगर आरक्षण समन्वय समितीचे सदस्य प्रा. सुभाष मस्के, संजय माने यांनी चक्क जेसीबीच्या सहाय्याने आमदार पडळकर यांच्यावर विविध फुलांची उधळण करत घोषणा दिल्या. त्यांच्या स्वागतासाठी झेंडू, आष्टर, गुलाब, गुलछडी, शेवंती अशा विविध 100 हून अधिक पोती फुलांचा वापर केला. रुग्णालयाच्या वतीनेही त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

या वेळी आमदार पडळकर म्हणाले, आज कोरोनामुक्त झाल्याचा मला फार मोठा आनंद झाला आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते आणि गोरगरीब जनतेचे आशीर्वाद मिळाल्याने मी लवकर बरा झालो आहे. लोकांच्या सेवेसाठी माझे संपूर्ण आयुष्य मी समर्पित केले आहे. कार्यकर्त्यांनी यापुढच्या काळात सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे. 

झरे (ता. आटपाडी, जि. सांगली) गावाकडे जाताना ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कोर्टी येथील ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली. येथील कार्यकर्त्यांनी आमदार पडळकर लवकर बरे व्हावेत यासाठी महादेवाला शंभर नारळाचे तोरण बांधण्याचे नवस केले होते. ते नवसही आमदार पडळकर यांच्या हस्ते मंदिरात नारळाचे तोरण बांधून पूर्ण केले. या वेळी संजय माने, रामभाऊ मिसाळ, अस्लम शेख, चेतन हाके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona free MLA Gopichand Padalkar was welcomed with flowers