कोरोना ग्राउंड रिपोर्ट : पुणे, मुंबईवरुन खेड्यात आलेले काय करतायेत?

अशोक मुरुमरकर
रविवार, 22 मार्च 2020

सोलापूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र, पुणे आणि मुंबईसह अन्य ठिकाणच्या कोरोना रुग्णांची संख्या आता 63 वर गेली आहे. याच्या धास्तीने खेड्यातील लोक आत आपल्या गावाकडे परत येत आहेत. त्यामुळे खेड्यात भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक गावात खबरदारी म्हणून ग्रामसेवक व पोलिस पाटील हे बाहेरून आलेल्या प्रत्येकाची नोंद घेत आहेत.

सोलापूर : चीन येथे तयार झालेला "कोरोना'आपल्याकडे येणार नाही हा काही दिवसांपूर्वी भ्रम होता. मात्र, तो आता महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे. पुणे आणि मुंबईत याचे रुग्ण जास्त आहेत. त्यापैकीही संसर्ग होणाऱ्यांचे प्रमाण कमी असून जे परदेशातून आले आहेत त्यांच्यात लागण झाल्याची संख्या जास्त आहे. "कोरोना'च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र पहिल्यांदाच "लॉकआउट'च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे पोटभरण्यासाठी कामाधंद्याच्या शोधात पुणे व मुंबईकडे गेलेले लोंढे आता खेड्याकडे वळाले आहेत. हे लोंढे गावात येताच नागरिक मात्र सजग झाले आहेत. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवत आहेत. पूर्वी दिवाळी, उत्सव किंवा कार्यक्रमानिमित्त परगावी गेलेल्यांची जुनी आठवणी काढत गप्पा रंगत, मात्र आता गावातील पारावर एकच चर्चा आहे ती म्हणजे कोरोना, कोरोना अन्‌ कोरोना. 

सोलापूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र, पुणे आणि मुंबईसह अन्य ठिकाणच्या कोरोना रुग्णांची संख्या आता 63 वर गेली आहे. याच्या धास्तीने खेड्यातील लोक आत आपल्या गावाकडे परत येत आहेत. त्यामुळे खेड्यात भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक गावात खबरदारी म्हणून ग्रामसेवक व पोलिस पाटील हे बाहेरून आलेल्या प्रत्येकाची नोंद घेत आहेत. गावांत दक्षतेची दवंडी देण्यात आली आहे. दिवसभर काम करून रात्री थोडा थकवा घालवण्यासाठी गावातील पारावर किंवा एखाद्या भिंतीच्या कोपऱ्यावर गप्पा दंग असलेले टोळके आता या कोरोनामुळे येणे बंद झाले आहे. 

खेड्यात येऊन काय केले जात आहे 
"कोरोना'च्या भीतीने खेड्यात आलेली अनेक मंडळी शेतात काम करत आहेत. सध्या सुगीचे दिवस असल्याने करमाळा तालुक्‍यात एका ठिकाणी पुण्यातून आलेला तरुण शेतात जनावरांना चारा-पाणी करताना दिसला. तर एका ठिकाणी शेतात गहू काढण्यास मदत करताना दिसला. एका आयटी कंपनीत काम करणारा तरुण म्हणाला, आता पुण्याचे नाव नाही घेणार. जे करायचे ते येथेच, असं म्हणून शेतात कामला लागला. 
 

कोण काय म्हणाले 
सोलापूर जिल्ह्याच्या टोकाला करमाळा तालुक्‍यात सीना नदीकाठावर सुमारे दीड हजार लोकसंख्येचे अळजापूर हे गाव आहे. या गावातील पप्पू वाकळे म्हणाला, कोरोनामुळे बाजार बंद आहे. कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून पालेभाज्या घेत आहेत. मात्र, सध्या भाज्या शेतात फेकून देण्याची वेळ आली आहे. गणेश शेळके हा कुल्फी विक्रेता आहे. तो म्हणाला, सध्या उन्हाळा आहे. दरवर्षी उन्हाळ्यात कुल्फी विकण्याचा मी व्यवसाय करतो. तसाच यंदाही व्यवसाय सुरू केला. मात्र, अन्य गावांत माझ्याकडे संशयाने पाहू लागले. उद्यापासून तुम्ही कुल्फी घेऊन येऊ नका असं सांगितलं. याच धंद्यावर माझं पोट असून तोच बंद पडला तर कसं करणार, आम्ही कुटुंब कसं चालवणार असा प्रश्‍न केला आहे. 
 
एसटीत गर्दी कायम 
सरकारने एसटीत गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, एसटीत गर्दी कमी झालेली नाही. पुण्यातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे चालक आणि वाहक हातबल झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. एका गाडीत अक्षरश: उभा राहून प्रवाशांनी टेंभुर्णी ते सोलापूर दरम्यान प्रवास केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Ground Report of solapur