परीक्षेपूर्वी दोघांचे ठरलं अन्‌ पेपर संपल्यावर थेट... 

तात्या लांडगे
सोमवार, 16 मार्च 2020

  • सोलापुरातील सदर बझार पोलिसांत गुन्हे : मुलींचे पळून जाण्याचे वाढतेय प्रमाण 
  • अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची पालकांची फिर्याद 
  • शुक्रवारी इयत्ता दहावीचा होता अकाउंट विषयाचा पेपर 
  • पालकांचा मैत्रिणी व नातेवाईकांकडे चौकशी : कोणासोबत पळून गेल्याचा पोलिसांकडून शोध 
  • पोलिसांकडून संबंधित महाविद्यालय अन्‌ त्यांच्या मैत्रिणींकडे चौकशी 

सोलापूर : येथील दहावीत शिक्षण घेत असलेल्या दोन मुली शुक्रवारी (ता. 13) अकाउंट विषयाचा पेपर देण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या. सोलापुरातील नामांकित महाविद्यालयात त्यांचा 11 वाजता पेपर होता आणि तो दुपारी 1 वाजता सुटणार होता. नेहमीप्रमाणे पेपर संपल्यावर घरी येणाऱ्या मुली खूपवेळ होऊनही घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी मुलींच्या मैत्रिणीसह नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, त्याठिकाणीही त्यांचा काही पत्ता लागलाच नाही. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठले आणि कोणीतरी आमच्या अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविल्याची फिर्याद दिली. 

हेही नक्‍की वाचा : मोदी सरकार अर्रार्र ! आवास योजनेतील 20 लाख लाभार्थी बेघरच 

पळून गेलेल्या मुलीतील एकीचे वय 17 वर्षे आठ महिने तर दुसऱ्या मुलीचे वय 17 वर्षे दोन महिन्यांचे वय आहे. पालकांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांकडून संबंधित महाविद्यालयात जावून मुलींच्या मैत्रिणीची चौकशी केली जात आहे. त्यांच्या ओळखीच्या मित्र-मैत्रिणींकडेही खात्री करण्यात येत आहे. पळून गेलेल्या दोन्ही मुली एकमेकींच्या मैत्रिणी असल्याची चर्चा असून दोघी एकाचवेळी मुलांसमवेत पळून गेल्याचीही चर्चा आहे. पोलिसांनी आता त्यांचा तपास सुरु केला असून पालकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून त्याच महाविद्यालयातील कोणी विद्यार्थी गैरहजर आहे का, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी परिसरातील कोणी पसार झाला आहे का, याची माहिती गोळा केली जात आहे. दरम्यान, आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने तपसात पोलिसांना अडचणीत येत असल्याचेही सांगितले जात आहे. 

हेही नक्‍की वाचा : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची कोंडी ! ग्रंथालये अन्‌ वस्तीगृहांना कुलूप 

कॉल रेकॉर्डवरुन पोलिसांनी सुरु केला तपास 
दहावीचा अकाउंटचा विषय देण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या दोन मुली पेपर संपल्यानंतरही घरी परतल्याच नाहीत. त्याच्या भितीने पालकांनी कोणीतरी फूस लावून मुलींना पळवून नेल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आता त्या मुलींचे कॉल रेकॉर्ड तपासायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. कॉल रेकॉर्डवरुन त्या मुलींना कोणी पळवून नेले अथवा कोणासोबत त्या गेल्या, याचा तपास लागेल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 

हेही नक्‍की वाचा : कोरोना तपासणीची प्रयोगशाळा आता सोलापुरात 

मुली पळून जाण्याचे वाढतेय प्रमाण 
मागील चार-पाच महिन्यांपासून सोलापूर शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार अन्‌ पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. दोन दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची विजापूर नाका पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. आता पुन्हा दोन मुली पळून गेल्याची नोंद सदर बझार पोलिसांत झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The two girls who took the exam fled