आठ ते दहा तासांमध्ये सोलापुरातच मिळणार "कोरोना'चा रिपोर्ट 

प्रमोद बोडके
Monday, 30 March 2020

171 जणांना अटक 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सोलापूर जिल्ह्यात 66 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून आतापर्यंत 1 हजार 13 गुन्हे दाखल झाले आहेत. 171 जणांना अटक करण्यात आली असून 289 वाहने जप्त करण्यात आली आहेत. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. आयसोलेशनमध्ये (विलगीकरण) आतापर्यंत 45 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 39 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सहा जणांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी असून उद्यापर्यंत (मंगळवार) त्यांचे रिपोर्ट येणे अपेक्षित आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
हेही वाचा - मोठी बातमी ! लॉकडाऊनमुळे अडकले 64 हजार 926 विस्थापित 
कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी आतापर्यंत पुण्याला पाठविण्यात येत होते. पुण्यातून रिपोर्ट येण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जात होता. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोना संदर्भातील रिपोर्ट मिळण्यासाठी फक्त आठ ते दहा तासांचा अवधी लागणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 
हेही वाचा - सहा दिवसात 1584 लिटर हातभट्टी जप्त 
या प्रयोगशाळेचा लाभ कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारांची चाचणी करण्यासाठी होणार आहे. सोलापूरसह मराठवाड्यातील व कर्नाटकातील काही जिल्ह्यांना होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 115 जण इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी 27 जणांचा कालावधी पूर्ण झाला. त्यांच्या कोरोना संदर्भातील कोणतीही लक्षणे न आढळल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून 88 जण अद्यापही इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये आहेत. जिल्ह्यातील 338 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. 209 जणांमध्ये लक्षणे आढळली नाहीत. 129 जण अद्यापही होम क्वारंटाईनमध्ये असून त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report will be available in Solapur in eight to ten hours