कोरोना : अपघातानंतर "त्या' दुसऱ्या दिवशीच कामावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी श्रीमती पाटील यांना घरी बसूनच काम करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, सुरवातीपासून ग्रामसेवा ही ईश्‍वर सेवा म्हणून नोकरी करणाऱ्या ज्योती पाटील यांनी एक दिवसही विश्रांती न घेता थेट, नागरिकांच्या सेवेसाठी त्या दुसऱ्या दिवशी तावशी गावात अवतरल्या. 

पंढरपूर (सोलापूर) : तावशी (ता. पंढरपूर) येथील महिला ग्रामसेविका ज्योती पाटील यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात त्यांचा एक हात फ्रॅक्‍चर झाला. अशा परिस्थितीत त्यांना डॉक्‍टरांनी विश्रांतीचा सल्लाही दिला आहे. परंतु, कोरोनामुळे अख्खं गाव संकटात असताना आपण घरी बसून राहणे योग्य नाही, असा विचार करून त्यांनी घरात न बसता, गळ्यात हात घेऊन कोरोनासंदर्भात गावातील नागरिकांत जनजागृती करत घरोघरी फिरत आहेत. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या ग्रामसेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

कोरोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न 
सध्या कोरोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांचा मोठा वाटा आहे. ग्रामसेविका ज्योती पाटील यांच्याकडे तालुक्‍यातील तावशी आणि गोपाळपूर या दोन गावांचा कारभार आहे. 

हेही वाचा : आरोग्य सेतू ॲपचे ‘हे’ व्हर्जन येणार पुढील दोन आठवड्यात

त्यांच्या स्कुटीला अपघात 
मागील आठ दिवसांपूर्वी कोरोना संदर्भातील एक बैठक संपवून त्या तावशी गावाहून गोपाळपूरकडे येत असताना त्यांच्या स्कुटीला अपघात झाला. यात त्यांचा एक हात फ्रॅक्‍चर झाला. अशा वेळी त्यांना डॉक्‍टरांनी काही दिवस घरीच विश्रांती करण्याचा सल्ला दिला. गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी श्रीमती पाटील यांना घरी बसूनच काम करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, सुरवातीपासून ग्रामसेवा ही ईश्‍वर सेवा म्हणून नोकरी करणाऱ्या ज्योती पाटील यांनी एक दिवसही विश्रांती न घेता थेट, नागरिकांच्या सेवेसाठी त्या दुसऱ्या दिवशी तावशी गावात अवतरल्या. 

हेही वाचा : पादुका एकत्रित आल्यास वारकऱ्यांचा आनंद होणार द्विगुणित

प्रेमाने ग्रामस्थही भावूक 
गोपाळपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संपूर्ण गाव सील केले आहे. अशा काळात ही त्या गावातील प्रत्येक घरी आणि वाड्यावस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांना कोरोना विषयी समुपदेशन करत आहेत. त्यांच्या या जिद्दीचे आणि गावाबद्दल असलेल्या प्रेमाने ग्रामस्थही भावूक झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: She's at work the next day after the accident